रावेर लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ? जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी स्पष्टच सांगितले…!
Who is the Mahavikas Aghadi candidate of Raver Lok Sabha? District President Ravindra Patil clearly said…! यावल : रावेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी यावल येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मंगळवारी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी यावल तालुक्यातील कार्यकर्त्यांशी येथील स्वामी अॅग्रो केंद्रात हितगुज केली. याप्रसंगी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, आदिवासी सेलचे प्रमुख एम.बी.तडवी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावेरसाठी उमेदवावर कोण असेल हे मात्र पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असे सांगून जिल्हाध्यक्षांनी चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलवला.
दोन दिवसात उमेदवारी जाहीर होणार
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार घोषित नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. रावेर मतदार संघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्याने व अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तुतारी चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो
रावेर लोकसभा मतदार संघासाठी स्वतः रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील आदी इच्छुक असल्याचे सांगितले. अंतिम उमेदवाराचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे हे जाहीर करतील. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाकडून कोणाचेही नाव घोषित होणार असले तरी आगामी प्रचाराचे दिवस पाहता जिल्हाध्यक्ष या जबाबदारीने तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेवून पक्षाचे तुतारी हे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचविण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले जात असल्याचे ते म्हणाले.
आमदार खडसेंचा भाजपा प्रवेश अफवाच
राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा भाजपा प्रवेशाबाबत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाकडून अफवा पसरवल्या जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाने कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित केले तर त्यांच्या पाठीशी आमदार एकनाथराव खडसे ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




