रावेरात मतदान जनजागृतीसाठी सायकल व दुचाकी रॅली
Cycle and two-wheeler rally for voting awareness in Raver रावेर : लोकसभा मतदार संघांमधील रावेर विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सायकल व मोटरसायकल रॅलीचे आयोजन रावेर शहरात करण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्या नेतृत्वाखाली मतदान जनजागृतीसाठी सायकल व दुचाकी रॅलीची सुरवात रावेर शहरातील तहसील कार्यालयापासून झाली.
मतदान टक्केवारी वाढण्यासाठी रॅली
ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावदा रोड, अकोले विद्यालय, चौराहा, चावडी, थडा भाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, गांधी चौक, आठवडे बाजारमार्गे कमलाबाई गर्ल्स हायस्कूलनजीक आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. शहरातील मतदान केंद्र क्रमांक 90 ते 95 या केंद्रांवर सर्वात कमी मतदान टक्केवारी असल्याने तेथील केंद्रातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी तसेच रावेर शहरातील मतदारांना मतदान करणे आपला हक्क आहे ही जाणीव करून देण्यासाठी रॅली काढण्यात आली. सूत्रसंचलन दीपक नगरे यांनी तर आभार तहसीलदार बंडू कापसे यांनी मानले.

यांचा होता सहभाग
सहा.जिल्हा निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्यासह तहसीलदार बंडू कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब वाळके, गट शिक्षणाधकारी दखणे, सहा.गट विकास अधिकारी राजेंद्र फेगडे, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, किशोर पवार यांच्यासह वन अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सर्व ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्यासह सेवाभावी संस्थांचा सहभाग होता.




