जळगावनंतर आता रावेरात महाविकास आघाडी देणार तूल्यबळ लेवा समाजाचा उमेदवार ?


जळगाव : जळगाव लोकसभेसाठी शिवसेना उबाटा गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी देत निवडणुकीचा आखाडा गाजवण्यास सुरूवात केल्यानंतर आता रावेर लोकसभेत महाविकास आघाडीकडून तूल्यबळ उमेदवाराला हेरण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने अंतर्गत नाराजी नाट्यांतून भाजपातील निष्ठावंत घराण्याचा युवा चेहरा हेरला असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. लवकरच हा चेहरा समोर आणण्यात येणार असून त्याबाबत घोषणा महाविकास आघाडीकडून केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

रावेरचा आखाडा महाविकास आघाडी गाजवणार !
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेतली मात्र दुसरीकडे ‘मविआ’ कडे आलेल्या या जागेवर अद्यापही उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. माजी आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर उमेदवार कोण ? हा प्रश्न समोर आला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी निवडणूक लढवण्यास अनुकूलता दर्शवल्यानंतर सामाजिक समीकरणांचा आढावा घेण्यात आला मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात आणखी तूल्यबळ म्हणून लेवा समाजाचा चेहरा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाला मिळाल्याची चर्चा आहे. याबाबत दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे.


मुंबईत झाली गुप्त बैठक !
भाजपाच्या निष्ठावंत घराण्यातील एका परिवारावर सातत्याने अन्याय होत असल्याने त्या युवा चेहर्‍याचे समर्थक आक्रमक झाले आहेत परंतू भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन यांनी बंड शांत केले मात्र हा युवा चेहरा खासदार शरद पवार यांनी हेरला आहे. आमदार रोहित पवार व जिल्ह्यातील एका नेत्यामार्फत संबंधित युवा नेत्यासोबत एक गुप्त बैठक दोन दिवसापूर्वीच मुंबईत झाल्यााची चर्चा आहे. यात रावेरच्या उमेदवारीसह आगामी विधानसभा व अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीने उमेदवाराची घोषणा लांबवली !
विशेष म्हणजे गुरुवारी रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शरद पवार गटाकडून जाहीर होणार होता परंतु नवीन राजकीय समीकरण जुळत असल्यामुळे उमेदवाराची घोषणा लांबली असल्याची चर्चा आहे. संबंधित युवा नेत्याने तुतारी चिन्ह घेऊन उमेदवारी केल्यास लेवासह मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीयांची एकगठ्ठा मते मिळतील आणि त्यातून विजयाचे गणित साकार करता, येईल अशी प्राथमिक रणनीती आखण्यात आल्याचे कळते.

उन्मेष पाटील यांच्या बंडानंतर युवा नेत्यावर वाढला दबाव !
वडिलांपाठोपाठ आपल्यावरही राजकीय अन्याय होत असल्याची भावना या युवा चेहर्‍यासह त्यांच्या समर्थकांमध्ये बळावली आहे. तशात उन्मेष पाटील यांनी बंड करत वेगळी भूमिका घेतल्यामुळे या युवा नेत्यावरवरही समर्थकांचा प्रचंड दबाव वाढत असल्याचे कळते. ज्या पद्धतीने भाजपमधील राजकीय भवितव्य संपल्याची खात्री झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीने रावेर लोकसभा मतदार संघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यातून होणारे संभाव्य प्रवेश लक्षात घेता संबंधित युवा नेत्यानेही वेगळा होण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी समर्थक आग्रही आहेत. जर खरोखर हा भाजपाच्या हा युवा चेहरा शरद पवार यांच्या गळाला लागला तर भाजपाला जळगाव जिल्ह्यात पुन्हा एक मोठा धक्का बसेल, यात शंका नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !