कार्यकर्त्यांनी वाढवला दबाव ! अमोल जावळे महाविकास आघाडीची तुतारी फुंकणार ?

आघाडीत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी वाढवला दबाव : जावळेंचे ‘वॉच अ‍ॅण्ड वेट’ ; निर्णय झाल्यास भाजपामध्ये राजकीय भूकंप


गणेश वाघ

Will Amol Javale blow the trumpet of Mahavikas Aghadi? भुसावळ : जळगाव लोकसभेप्रमाणेच रावेर लोकसभेतही मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. या दृष्टीने पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याने महाविकास आघाडीची उमेदवारीची घोषणा या कारणास्तव लांबत असल्याची चर्चा आहे. लोकसभेचे तिकीट कापले गेल्याने भाजपाचे रावेर लोकसभेचे पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. नेमकी ही बाब हेरून शरदचंद्र पवार गटाकडून रावेर लोकसभेत राजकीय भूकंप घडवण्याच्या हालचाली आहेत. कुठल्याही परीस्थितीत रावेरची जागा हातून जावू द्यायची नाही यास्तव शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत. तूर्त अमोल जावळे यांची भूमिका ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची असलीतरी महाविकास आघाडीची तूर्तारी ते ताकदीने फुंकतील व राजकीय इतिहास घडवतील, अशी दाट शक्यता राजकीय गोटातील सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

संकट मोचकच संकटात
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत तिकिटाची ऑफर दिली. पक्षावर व अपक्ष निवडणूक लढण्याचीही चर्चा झाली मात्र अमोल जावळे यांनी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अमोल जावळे यांनी पक्षाला जय श्रीराम केल्यास भाजपातील मोठा गट त्यांच्यासोबत राहील अथवा पक्षात राहूनच छुपी मदत जावळे यांना करेल, अशी शक्यता आहे त्यामुळे भाजपवर किंवा राज्यावर येणार्‍या संकटाला तोंड देणारे व संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन हेच यामुळे संकटात येवू शकतात, अशी चर्चा आहे.


बालेकिल्ल्यात खासदारांच्या वाढल्या अडचणी
रावेर लोकसभा ही भाजपाच्या दृष्टीने बालेकिल्ला आहे. 2014 मध्ये हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून तत्कालीन नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना टिकीट दिले होते त्या दोन वेळा या मतदारसंघातून खासदार झाल्या मात्र यंदा त्यांचे सासरे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खासदारांना तिकीट मिळाले असलेतरी पक्षातून प्रचंड अंतर्गत विरोध दिसून येत आहे. अलीकडील काळात अनेकांनी राजीनामा अस्त्र उगारत पक्ष श्रेष्ठींकडे खासदारांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला तर मंत्री महाजन व उमेदवार खासदार रक्षा खडसे समोर झालेली नाराजी व्हायरल व्हिडिओमुळे राज्यभरात प्रचंड चर्चेत ठरली.

कार्यकर्त्यांनी वाढवला जावळेंवर निर्णयासाठी दबाव
भाजपामध्ये अत्यंत निष्ठावान व स्वच्छ चारीत्र्याची प्रतिमा असलेल्या रावेर लोकसभेमध्ये खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे ऐनवेळी तिकीट कापून भाजपाने त्यांच्यावर अन्याय केला मात्र ही अन्यायाची फेड भाजपा आता रावेर लोकसभेत त्यांच्या मुलाला अर्थात अमोल जावळे यांना तिकीट देवून करेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र पुन्हा जावळे परिवारावर अन्याय करीत तिकीट कापण्यात आले मात्र आता कार्यकर्ते प्रचंड संतप्त आहेत. अमोल जावळे यांनी आता पक्षातून बाहेर पडत आघाडीचे तिकीट घ्यावे यासाठी कार्यकर्ते दबाव वाढवत आहेत मात्र जावळे यांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका अवलंबली आहे.

नाराजी असलीतरी अमोल जावळे यांचे पक्षात काम
संकट मोचक गिरीश महाजनांनी नाराजींची मनधरणी करीत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अमोल जावळे यांनी नाराजी मनात ठेवत पक्षाचे काम सुरू ठेवले आहे. दोन दिवसांपासून भाजपाच्या मेळाव्यांसह प्रचारात ते सक्रिय आहेत, शनिवारी भाजपा स्थापना दिन कार्यक्रमातही ते दिसून आले मात्र ते खरोखर महाविकास आघाडीत जाणार का ? हा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. आता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतांना ते भाजपला जय श्रीराम करीत भाजपापुढे कडवे आव्हान उभे करतात की पक्षातच राहून भाजपाचे काम करतात हे आगामी दिवसात कळणारच आहे. अमोज जावळे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !