आमदार एकनाथराव खडसेंची भाजपात घरवापसी : लवकरच होणार प्रवेश सोहळा !
Yes I am joining BJP! ; MLA Eknathrao Khadse’s public confession भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे लवकरच भाजपात घरवापसी करीत आहेत. भाजपात प्रवेश करीत असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. आमदार खडसे हे भाजपात दाखल होत असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आमदार खडसे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खडसे भाजपात दाखल होतील, अशी चर्चा आहे. आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मोठी मदत होणार आहे तर राष्ट्रवादीसाठी ही बाब मात्र मोठी धक्कादायक ठरणार आहे.
खडसे म्हणाले होते ; लपून छपून भाजपात जाणार नाही
फेब्रुवारी महिन्यापासून आमदार खडसे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा होत्या तर जळगावात माध्यमांशी बोलताना आमदार खडसे यांनी मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) परवानगीची गरज नाही. मी लपून-छपून जाणार नाही. मात्र जेव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन. पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन असं खडसे म्हणाले. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो. त्यामुळे यांच्यापेक्षा (मंत्री गिरीश महाजन) वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामार्या केल्या नाहीत, असे आमदार एकनाथ खडसे म्हणाले होते.

अखेर नाथाभाऊंचे ठरते : 9 रोजी होणार प्रवेश
काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी वरीष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली व अनेक राजकीय विषयांवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी आमदार खडसे यांचा भाजपात प्रवेश झाल्याची चर्चा होती मात्र आमदार खडसे यांनी त्याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता.
सुनेने उमेदवारी अन् आमदार खडसेंची माघार
आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये येत असल्याने आता उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलणार आहेत. भाजपकडून सुरूवातीपासून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता त्यामुळेच आपण राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली मात्र रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र एकनाथ खडसेंनी तब्येतीचं कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली त्यामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीसाठी हा राजकीय डाव टाकला होता का? अशी चर्चा आता होत आहे.
मंत्री गिरीश महाजनांच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करीत असताना जळगावातील त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन हे काय भूमिका घेतात ? याकडे आता लक्ष लागले आहे. आमदार खडसेंच्या घरवापसीने मात्र खान्देशातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आमदार खडसेंसोबत अॅड.रोहिणी खडसे यादेखील प्रवेश करणार का ? याबाबत मात्र अद्याप माहिती कळू शकली नाही.
- आमदार एकनाथराव खडसेंचा राजकीय प्रवास असा
- 1995-1999 युती सरकारच्या काळात मंत्री पद
- 2009 ते 2014 विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद
- जून 2016 मध्ये भोसरी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा
- 2019 ला पक्षाने त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना विधानसभेचे तिकीट दिले, रोहिणी खडसेंचा पराभव
- 2020 मध्ये पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश
- 2024 मध्ये चार वर्षांनी पुन्हा स्वगृही परतणार




