श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मंगळवारपासून चैत्र नवरात्रोत्सव
Chaitra Navratri Festival from Tuesday at Shri Kshetra Satpuda Niwasini Ai Manudevi Temple यावल : यावल तालुक्यातील पश्चिम भागात आडगाव गावापासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंगळवारपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे. शनिवारी याकरीता मंदिराचे मुख्य पूजारी व दुकानदारांच्या उपस्थितीत कळस स्वच्छ करीत पूजन करण्यात आले.
मंदिर परिसराची स्वच्छता
दरवर्षी येथे चैत्र नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येत भाविक-भक्तांची येथे दर्शनाकरीता गर्दी होते. आडगाव, ता.यावल या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. या मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवारी सकाळपासून मनुदेवी मंदिरावर देवीचा कळस पंचामृत व पाण्याने धुऊन सर्व मंदिराची व परिसरातील स्वच्छता करण्यात आली. कळस पूजेचा मान हा मनुदेवी मंदिराचे मुख्य पूजारी समाधान महाराज कोळी सर्व कर्मचारी व मंदिर परिसरातील दुकानदार यांना मिळाला. सर्वांनी कळसाला मंत्र उच्चारत करून कळसाची पूजा केली. संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ धुऊन स्वच्छता अभियान राबवले. संपूर्ण कार्यक्रम विश्वदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

यांचे लाभले सहकार्य
प्रामुख्याने दुकानदारांमध्ये दीपक कोळी, नरेंद्र कोळी, सिकंदर तडवी, नरेंद्र पाटील, वनराज पाटील तसेच मंदिर संस्थानचे नितीन पाटील, देणगी विभागाचे प्रशांत पाटील, पूजा भंडार विभागाचे जालम पाटील, महिला वर्गामध्ये मायाबाई वनराज सपकाळे, मायाबाई नरेंद्र कोळी या सर्वांचा सहभाग लाभला होता.दुकानदारांनी यात्रे उत्सवासाठी आपली दुकाने थाटली आहेत. चैत्र नवरात्र उत्सवात येणार्या भाविकांसाठी देवीचे फोटो, पितळी माळं, पूजा साहित्य आदींची दुकाने थाटली आहेत.
सुटीच्या दिवशी गर्दीची शक्यता
मंगळवार, 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यात गुरूवारी सुटी येत असून त्या पाठोपाठ शनिवार व रविवार श्रीराम नवमीची सुटी येत असल्याने सर्व सुट्यांच्या दिवशी सातपुड्याच्या वनराईत पर्यटनासह दर्शन असा योग साधण्याकरीता भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.




