राष्ट्रवादीकडून अखेर रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर

भाजपाच्या खासदार रक्षा खडसेंविरोधात होणार तूल्यबळ लढत : पॉवरबाज शरद पवारांचा रावेरात पॉवर गेम


NCP has finally announced the candidature of Sriram Patil for Raver Lok Sabha भुसावळ : रावेर लोकसभेत महाविकास आघाडीकडून मराठा चेहर्‍यालाच उमेदवारी मिळेल, असे वृत्त ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने 27 मार्च रोजी दिले होते व हे वृत्त आता प्रत्यक्षात खरे ठरले आहे. भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांना तूल्यबळ लढत देण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने रावेरातून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवार, 10 रोजी पक्षाने यादी प्रसिद्ध केली असून त्यात श्रीराम पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.

उद्योग क्षेत्रात भरीव कार्य
श्रीराम दयाराम पाटील हे 53 वर्षीय उद्योजक असून समाजातील विविध क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. रावेर तालुक्यातील रणगांव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम अ‍ॅग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज उभारली आहे. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन हे रावेर, नशिराबाद, जळगाव अशा ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.


एक सामान्य मेकॅनिकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजकापर्यंत आहे. त्यांना घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र भूमिपुत्र म्हणून गावाशी नाळ जोडलेले तसेच सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असे हे व्यक्तिमत्व आहे.

पॉवरबाज पवारांचा पॉवर गेम
रावेर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गत अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपाशी दोन हात करता येईल व तुल्यबळ लढत होण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार यांनी पॉवर गेम खेळत मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट आहे. पक्षाने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत श्रीराम पाटील हेच आता रावेर लोकसभेचे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातार्‍यात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर
सातारा लोकसभा जागेवर प्रकृतीच्या कारणास्तव विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवल्याने या जागेवर आता आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून सातार्‍यात अद्याप उमेदवाराची घोषणा कऱण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्वीटमध्ये म्हटलंय की, तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक 2024 ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !