पंतप्रधानांचे कार्यालय आता वसुली कार्यालय : प्रकाश आंबेडकर

वंचित आघाडीचा भुसावळात मेळावा : महाविकास आघाडीसह भाजपावर सडकून टिका


Prime Minister’s Office now Recovery Office : Prakash Ambedkar भुसावळ : देशात आता वसुलीचे राज्य आहे. चौकशा यंत्रणांचा गैरवापर चालवला जात असून पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून आता वसुलीचे कार्यालय झाले असल्याचे टिका वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांनी भुसावळातील जाहीर सभेत केली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ भुसावळातील डी.एस.ग्राउंडवर शुक्रवार, 3 मे रोजी दुपारी 12 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पाटलांचा हेका आडवा आला
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमदार खडसेंनी राष्ट्रवादीकडून रावेरसाठी उमेदवारी मागितली होती त्याचवेळी आपण शरद पवारांना खडसे हे राष्ट्रवादीत राहणार नाही, असे सूचित केले होते मात्र पवारांनी ऐकले नाही कारण पाटलांचा हेका आडवा आला, अशी टिका त्यांनी पवारांवर केली. सून रक्षा खडसे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर होताच सासरा राष्ट्रवादीत राहणार कसा ? म्हणून तेही भाजपात गेले मात्र त्यावेळी वंचित आघाडीने रावेरची जागा मागूनही आम्हाला देण्यात आली नाही उलट तूल्यबळ उमेदवार असल्याचे कारण पुढे करण्यात आले मात्र तीन पक्ष बदलून आलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आल्याची टिका आंबेडकरांनी केली. खडसे हे हुशार नेते आहेत, सर्वच पदे आपल्याकडे रहावीत, असे त्यांना वाटते. आदिवासी ख्रिश्चन झाल्यानंतर त्यांचे आरक्षण रद्द करा, असे मागे खडसे म्हणाले होते मात्र आदिवासींचा निसर्ग हाच धर्म असल्याने त्यांना त्यावर आरक्षण मिळालेले नाही, असेदेखील आंबेडकर म्हणाले.


भाजपा-महाविकास आघाडीवर टिका
दिल्लीत शेतकर्‍यांनी वर्षभर उपोषण केले तेथे पंतप्रधान गेले नाहीत मात्र त्यांनी घरात बीन वाजवली, अशी टिका करीत ते म्हणाले की, त्यांना तुम्ही खलिस्तानवादी म्हणतात मग तुम्ही कोणत्या धुतल्या तांदळाचे आहात? असा प्रश्न त्यांनी भाजपाला करीत इलेक्ट्रॉल बॉण्डवर सडकून टिका केली. हे सरकार कंगाल असल्याचा दावा वर्ल्ड बँकेने केला आहे. 2014 मध्ये शंभर रुपयांवर 26 रुपये कर्ज होते मात्र ते 2026 मध्ये 96 रुपयांवर जाईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपाकडे भ्रष्टाचार धुण्याची वॉशिंग मशीन असल्याचे तुम्ही म्हणता मग तुमच्याकडे (महाविकास आघाडी) कडे असे ब्रेन वॉश करण्याचे कोणते मशीन आहे? असा प्रश्नही बाळासाहेबांनी उपस्थित केला. जो धर्मवादी आहे तो तुमच्याकडे आल्यानंतर सेक्यूलरवादी होतो, अशी टिका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर भारीपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, जिल्हा महासचिव योगेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष मौलाना इम्रान तडवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !