लोकशाहीच्या उत्सवासाठी सजतेय ‘रावेर’ नगरी

पाल वन्यजीव अभयारण्य जंगल सफारी थिमवर आधारित मतदान केंद्र


रावेर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर रावेर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील मतदानासाठी चार शाळा विविध संकल्पनांनी सजवण्यात येणार आहेत. यामध्ये ‘केळीचे आगार – रावेर शहर’ या संकल्पनेवर आधारित कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूलमधील मतदान केंद्रांची तयारी झाली असून याशिवाय पाल वन्यजीव अभयारण्य जंगल सफारी वर आधारित ‘पर्यावरण पर्यटन’ एन.एन.अकोले महाविद्यालयात असणार आहे. यशवंत महाविद्यालयात सखी मतदान केंद्र व इंग्लिश स्कूल बालस्नेही मतदान केंद्र बनवण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देवयानी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे व नगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तयारीला लागलेले आहेत.

मतदान केंद्रावर उष्माघात प्रतिबंधक औषधे उपलब्ध
पाल वन्यजीव अभयारण्य जंगल सफारी थिमवर आधारित मतदान केंद्रमतदान केंद्रनिहाय भाग याद्या रावेर नगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील कोणता भाग कोणत्या मतदान केंद्रामध्ये समाविष्ट आहे याची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगरपालिकेकडून मतदानाची ठिकाणे असणार्‍या सर्व शाळांची साफसफाई करण्यात आली असून यासाठी प्रत्येक शाळेकरिता दोन स्वच्छता कर्मचारी नेमणुकीचे आदेश मुख्याधिकारी यांनी बजावले आहेत. शहरातील मतदानाच्या ठिकाणी असणार्‍या प्रत्येक शाळेवर उष्माघातावर इलाज करण्यासाठी आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथमोपचार व उष्माघात प्रतिबंधक औषधे असतील.



दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर
प्रत्येक मतदानाच्या ठिकाणी स्तनदा माता व मतदारांसोबत येणार्‍या लहान मुलांसाठी पाळणाघरे तयार करण्यात आली आहेत. मुलांकरिता आकर्षक सजावट व खेळणीदेखील येथे ठेवण्यात येणार आहेत. स्तनदा व माता बालक यांना आराम करण्यासाठी सर्व बालसंगोपन केंद्रावर गादी, पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक अशी जय्यत व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची महिला मतदारांना मदत करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगानी निश्चिन्तपणे मतदान करावे यासाठी पालिका सज्ज आहे.

मतदान टक्केवारी वाढीसाठी नगरपालिका कर्मचार्‍यांचे परिश्रम
50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणार्‍या शहरातील भागात पालिका कर्मचार्‍यांचा चमू घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. वोटर स्लीप प्रत्येक मतदाराला भेटली का याची खात्री करत आहे. तसेच शहरातील सर्व मतदारांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घेऊन त्यावर जिल्हाधिकारी यांची मतदान करण्याचे आव्हान करणारी ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्यात येणार आहे.

सोमवार, 13 मे 2024 रोजी सर्व शहरवासीयांनी मतदान करावे, असे आवाहन रावेर नगरपालिका मुख्याधिकारी स्वालिया मालगावे यांनी केले आहे. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात संपूर्ण शहराने सहभाग घेण्यासाठी आरोग्य निरीक्षक युवराज गोयर, वैभव नेहेते, कुणाल पाटील, प्रमोद चौधरी, निलेश महाजन, दीपक सुरवाडे, प्रकाश शिंदे, वाजीद खान, प्रदीप संदाशिव व सर्व नगरपालिका कार्यालयीन व स्वच्छता कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !