धक्कादायक ! वकिलाकडून स्वीकारली लाच : दुय्यम निबंधकासह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात


नाशिक (रविवार, 27 सप्टेंबर 2026) : पक्षकाराच्या शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजार दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकमधील दुय्यम निबंधक प्रमोद लक्ष्मण वामन (57, नाशिक रोड, नाशिक) व खाजगी पंटर योगेश बाळू डांगले (38, पिंपळास रामाचे, ता.निफाड) यांना अटक करण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे 38 वर्षीय पुरुष व व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या पक्षकाराच्या शेतजमिनीच्या खरेदी दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी आरोपी क्रमांक 1 प्रमोद लक्ष्मण वामन (57, दुय्यम निबंधक वर्ग-2, नाशिक-4) यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारीच्या अनुषंगाने 24 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 4.23 ते 7.20 वाजेच्या दरम्यान लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपींनी सुरुवातीला 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती सहा हजार रुपये आणि पुन्हा तडजोडीनंतर चार हजार 200 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 4 परिसरात आरोपी खाजगी पंटर योगेश बाळू डांगले (38) याने आरोपी क्रमांक एकच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून चार हजार 200 रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर पथकाने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस निरीक्षक विकास शिवाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यात आला. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत होते.

लाच मागणार्‍या लोकसेवकाबद्दल किंवा लाचखोरीसंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !