भुसावळ रेल्वे न्यायालयाचा दणका : तीन प्रकरणातील आरोपींना दंड व शिक्षा
भुसावळ : रेल्वे न्यायालयाचे न्या.एच.डी.देशिंगे यांनी रेल्वे स्थानकावर हाणामारी, तोडफोड, भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना दंड व शिक्षा ठोठावली आहे. चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नुकसान प्रकरणात सुर्यभान मल्हारी यांच्यासह 11 जणांना दोषी ठरवून कलम 143 मध्ये 3 महिने शिक्षा, कलम 148 मध्ये एक वर्ष शिक्षा, कलम 452 मध्ये दोन वर्षे शिक्षा व 10 हजार दंड आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन गणेश शिरसाठ यांनी काम पाहिले.
अन्य दोन गुन्ह्यात दंड व शिक्षा
भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत भांडण करून शांतता भंग करणार्या पती-पत्नीस एक हजार रुपये दंड सुनावण्यात आला तसेच रेल्वे प्रवासात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दोषी ठरवून 1 हजार रुपये दंड व एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या दोन्ही प्रकरणात भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन दिवाणसिंग राजपूत यांनी काम केले. या प्रकरणांमध्ये सरकारी वकील राकेश चौधरी यांनी विविध न्यायालयांच्या निकालांचे दाखले दिले.



