भुसावळातील अ‍ॅड.निर्मल दायमा यांचे दातृत्व : आई-वडीलांच्या स्मृतीनिमित्त गतीमंद विद्यार्थ्याला घेतले दत्तक

दायमा परिवाराने निर्माण केला आदर्श : शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार


भुसावळ : औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकील अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी आपल्या आई-वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या वर्षी तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले तर यंदा एका गतीमंद विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे. ते शिकतील तोपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च दायमा परिवार करणार आहे. स्व.राजेंद्र दायमा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने या विद्यार्थ्यांना या वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची रक्कम डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते देण्यात आली.

शैक्षणिक खर्चाचे स्वीकारले दातृत्व
अनेक हुशार विद्यार्थी घरची परस्थिती नसल्याने शिक्षण घेवू शकत नाही. अशा होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी घेतली आहे. गेल्यावर्षी त्यांनी दोन विद्यार्थिनी व एका विद्यार्थ्याचा ते शिकतील तोपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्चाचे दातॄत्व उचलले होते. यावर्षी त्यात अजून एका गतीमंद विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आला. अ‍ॅड.दायमा यांचे वडील तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्र दायमा व आई स्व.विजयालक्ष्मी राजेंद्र दायमा यांच्या या प्रीत्यर्थ हा उपक्रम राबवला गेला. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, सुरजीतसिंग गुजराल यांच्याहस्ते बालकांना रक्कम सुपुर्त केली. यावेळी अ‍ॅड.निर्मल दायमा, नेहा दायमा, महेश चौधरी, दीपक टेकवानी आदींसह परिवारातील सदस्य उपस्थित होते.


दरवर्षी रक्कम सुपूर्द करणार
शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते शिकतील तोपर्यंत त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी अ‍ॅड.दायमा यांनी घेतली आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी त्यांना रोख रक्कमेसह शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. हेच विद्यार्थी भविष्यात मोठे होऊन त्यांच्यासारख्या अनेक गरजू मुलांना मदतीचा हात देतील, अशी अपेक्षाही यावेळी अ‍ॅड.दायमा यांनी व्यक्त केली.

अजून काही विद्यार्थ्यांना दत्तक घेवू
जे विद्यार्थी खरोखर हूशार आहेत मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिकू शकत नाही. त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षी काही विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा, अशी अपेक्षा आहे. चार मुलांना शोधून त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे. आई- वडीलांच्या स्मृतींना हीच खरी श्रध्दांजली असल्याचे अ‍ॅड.निर्मल दायमा म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !