मध्य रेल्वेच्या 15 कर्मचार्यांना जीएम सुरक्षा पुरस्कार
भुसावळ विभागातील सात कर्मचार्यांचा सहभाग
भुसावळ : कर्तव्यावर असतांना सतर्क राहून उत्कृष्ठ काम करून रेल्वेचे संभाव्य नुकसान टळल्यामुळे भुसावळ विभागातील सात कर्मचार्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देऊन जीएम आर.के. यादव यांनी सन्मानित केले. विशेष म्हणजे भुसावळ विभागातील सा कर्मचार्यांना प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईतील कार्यक्रमात गौरव
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे मंगळवार, 2 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात 15 कर्मचार्यांना सुरक्षा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ज्यात मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे. या कर्मचार्यांनी ड्युटीवर असताना त्यांनी घेतलेली दक्षता, गेल्या काही महिन्यांत अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी आणि गाड्यांच्या कामकाजात सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संवर्धन कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि दोन हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कर्मचार्यांच्या सतर्कतेची दखल
घोटी येथे 10 जून रोजी रात्री 10.15 वाजता ट्रॅक मेटेंनर, अभियांत्रिकी भगवान भीम हे कर्तव्यावर असतांना वेल्ड फ्रॅक्चरचे निरीक्षण केले. त्यांनी तात्काळ कारवाई करून सर्व संबंधित अधिकार्यांना सूचना केल्यात. यामुळे संभाव्य अपघात टळल्याने त्यांना सन्मानित केले. नवी अमरावती येथील ट्रॅक मेटेनर गोविंद शर्मा हे 19 मे या दिवशी कामावर असतांना गुजराथ मालगाडीच्या वॅगनमधून मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी तात्काळ ही घटना नवी अमरावती स्टेशन मास्तर यांना कळविली. तातडीने केलेल्या कारवाईमुळे रेल्वेचे नुकसान टळल्याने शर्मा यांचा गौरव करण्यात आला. बोरगाव येथील गेटमन गजानन वानखेडे हे 29 मे या दिवशी गेेट क्रमांक 44 वर कामावर असतांना गुजराथी यांना मालगाडीच्या वॅगनमध्ये धुर दिसला त्यांनी ही माहिती स्टेशन मास्तर यांना दिल्यानंतर मोठा संभाव्य अपघात टळला. खंडवा येथील तंत्रज्ञ दिलीप गुलाब हे 31 मे रोजी कर्तव्यावर असतांना दानापूर-पुणे एक्स्प्रेस गाडीचे डब्याचे हॉट एक्सल आढळून आले. त्या एक्स्लचे तापमान हे 800 सेंटीग्रेड होते त्यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला तसेच भुसावळचे तंत्रज्ञ मुकेश कुमार पंडीत हे 19 रोजी रेल्वे यार्डात चाचणी करतांना मालगाडीची एक वॅगन डावीकडे झुकतांना दिसली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना सांगताच तपासणी केली असता, त्यात असलेले कॉईलचे बंडलच्या पट्टा तुटल्याने ते बंडल दुसरीकडे सरकले होते. मुकेश कुमार यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे रेल्वेचा अपघात टळला. भुसावळ येथील लोको पायलट एस.व्ही.माहुरकर हे 13 मे या दिवशी कर्तव्यावर असतांना मालगाडी न्यायडोंगरी स्टेशनच्या लूप लाईनीवरून चालविल्यावर त्यांच्या लक्षात आले की, पुढे एक अंतर आहे. त्यांनी तत्काळ गाडी थांबविली. वरिष्ठांना माहिती दिली. पॉइंट क्लॅम्प लावून गाडी रवाना करण्यात आली, यामुळे संभाव्य अपघात टळला. 26 मे या दिवशी असिस्टंट लोको पायलट हे वडोदरा-मलकापूर सेक्शनमध्ये झालेल्या भीषण वादळामुळे मालगाडीचा वेग नियंत्रीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या लक्षात आले एक झाड रेल्वे रूळांवर पडलेले आहे. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्याने संभाव्य अपघाट टळला. यामुळे कर्मचार्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रेल्वेचे विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




