ज्येष्ठांसाठी आता मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : असा मिळेल योजनेचा लाभ
मुंबई : महाराष्ट्रासह परराज्यातील तीर्थस्थळांना ज्येष्ठांना आता मोफत भेटी देता येणार आहेत शिवाय राहण्याची व जेवणाचीदेखील व्यवस्था सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आता त्याबाबत जीआर जारी केला आहे. या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या योनजेचा शासन आदेश रविवार, 14 रोजी काढण्यात आला.
जिल्हाधिकारी करणार पात्र लाभार्थींची निवड
या योजनेवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली. जिल्हास्तरीय समिती संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ही समिती याविषयीच्या अर्जाची छाननी करुन पात्र व्यक्तीची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

अशा आहेत अटी आणि शर्ती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 60 वर्षाहून अधिक वय असणार्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असून निर्धारित तीर्थस्थळापैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार असेल. प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा 30 हजार कमाल आहे. यामध्ये भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश आहे. लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे शिवाय लाभार्थी कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावे, अन्यथा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही
राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये सिद्धविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, मुंबादेवी, वाळकेश्वर मंदिर, गोराई येथील विश्व विपश्यना पॅगोडा, शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरसह राज्यातील अनेक मोठ्या स्थळांचा समावेश आहे.




