संत मुक्ताबाई पालखी आगमनाची तयारी पूर्ण
ह.भ.प.लखन महाराज पाटील यांना आदर्श वारकरी पुरस्कार जाहीर
मुक्ताईनगर (8 ऑगस्ट 2024) : खान्देशचे वैभव आदिशक्ती मुक्ताबाई आषाढी वारी पालखी आगमन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मुक्ताईनगर पंचक्रोशीतील नागरिक स्वागतासाठी सज्ज आहेत. शेकडो वर्षांपासूनची अखंड परंपरा जोपासत मूळ मंदिर समाधीस्थळाहून 18 जून रोजी पंढरपूर आषाढी वारीस गेलेली मुक्ताई पालखी शनिवारी स्वगृही परतत आहे. गुढी-तोरणे, पताका, स्वागत कमानी, शुभेच्छा फलक लावून आतषबाजी केली जाणार असून यानिमित्त संपूर्ण शहरात सजावट करण्यात आली आहे. हजारो भाविकांना ठिकठिकाणी चहापान, दुध-बिस्कीट, फळे, नाश्तासह, भव्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्ताई पालखी आगमन सोहळा स्वागत समितीचे सदस्य दानदात्यांच्या सहभागातून संपूर्ण नियोजन करीत आहेत. याकरिता महिनाभरापासून स्वागत समिती सदस्य परिश्रम घेत आहे.
भाविकांसाठी महाप्रसाद
यंदा 600 किलो रवा, एक हजार किलो साखर, 40 डबे तुप, मनुका व काजू 50 किलो मिळून शिरा तयार करण्यात येईल तर 600 किलो तूरडाळ, 200 किलो मिरची व 30 डबे तेल, शंभर किलो लसूण आदी साहित्यातून मिरची भाजीचा महाप्रसाद बनविण्यात येणार आहेत.

सहा हजार घरातून येणार्या पोळ्या
पंचक्रोशीतील कोथळी, सालबर्डी, हरताळे, मानेगाव, वढवे, उचंदे, शेमळदे, सुकळी, दूई, निमखेडी, घोडसगाव, पिंपरी अकाराउत, नरवेल, वाघोळा, सातोड, रुईखेड, सारोळा आदी 18 गावे व मुक्ताईनगर शहरातील सहा हजार घरातून दोन लाख पोळ्या संकलीत होणार आहेत. महाप्रसाद वाटपासाठी 20 विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून 500 सेवाधारी त्याद्वारे सेवा देतील.
मुख्य आकर्षण
परतवारी आगमन सोहळा प्रसंगी भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा बालगट 10, महिलागट 62, पुरूष गट 32 अशा तीन गटात 104 भजनी मंडळ सहभागी झाले आहेत. यातील भजनी मंडळाचे देखावे, पाऊल्या, फुगडी, गायनाचे सादरीकरण भाविकांचे मुख्य आकर्षण असेल.
आदर्श वारकरी पुरस्कार जाहीर
संत मुक्ताई पालखीसोबत दोन्हीबाजूने पायी वारीत चालणार्या वारकर्यास भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील आदर्श वारकरी पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र, पंचवस्त्र व 11 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाचा पुरस्कार कीर्तनकार ह.भ.प.लखन महाराज पाटील (रा.कांडवेल) यांना जाहीर झाला आहे. समारोप प्रसंगी प्रदान करण्यात येणार आहे. लखन महाराजांची ही बारावी वारी आहे.
नवीन मुक्ताई मंदिरात पालखीचा मुक्काम
शुक्रवारी पालखी सोहळा नवीन मुक्ताई मंदिर येथे मुक्कामी राहील. सिव्हिल सोसायटीतर्फे वारकर्यांची मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिीर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थित दिंडी स्पर्धेला आरंभ होईल.
