यावल शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन
यावल (11 ऑगस्ट 2024) : यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांच्या विविध संघटनांकडून सजीव देखावे व विविध वेषभूषेतील पारंपारिक नृत्य यांचे प्रदर्शन करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तडवी वसाहत, मनुदेवी मंदिरापासून तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आल्या. आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार मोहन माला नाझीरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जहागीर तडवी, दिलरुबाब तडवी, संदीप सोनवणे, एम.बी.तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रसंगी जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्याार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
वनजमीन पट्ट्याचे वाटप
मिरवणुका एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात वनजमीन पट्याचे तसेच प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या मिरवणुकीत भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, डॉ.कुंदन फेगडे, भाजपाच्या डॉ.केतकी पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, ज्ञानेश्वर महजन, भगतसिंग पाटील, राजीव पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भुसावळचे धीरज चौधरी, यांच्यासह राजकीय, सामाजिक, आदिवासी नेते, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले.

