भुसावळातील खड्डेमय यावल रस्त्याचे डांबरीकरण

गणेशोत्सवात भाविकांसह वाहनधारकांना मोठा दिलासा


भुसावळ (6 सप्टेंबर 2024) : शहरातील सर्वात वर्दळीच्या यावल रस्त्याची पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली मात्र कामास विलंब होत असल्याने गणेशोत्सवात भाविकांसह नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता स्थानिक कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गुरुवारपासून सुरू केल्याने वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. राहुल नगर ते यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत हे काम केले जाणार आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप
शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळा ते तापी नगर रिक्षा स्टॉपपर्यंतचा 650 मीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून अन्य तांत्रिक मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने नागरिक व वाहनधारकांची गैरसोय पाहता आमदार संजय सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या.

तूर्तास डांबरीकरण मात्र लवकरच काँक्रिटीकरणही होणार  : आमदार
यावल रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे असून लवकरच या कामास सुरूवात होईल मात्र रस्त्याची झालेली अवस्था व गणेशोत्सवात भाविक व वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्यानंतर रस्त्याचे तूर्तास डांबरीकरण करण्यात येत आहे. यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र त्यातील डांबरीकरणाची क्वांटीटी बाकी असल्याने त्यातून हे काम केले जात असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. जामनेर रस्त्याचेही लवकरच काम होईल, असेही त्यांनी सांगितले.

जामनेर रस्त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर
शहरातील अत्यंत वर्दळीच्या जामनेर रस्त्याचीही दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाबाबतही तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश आमदार संजय सावकारे यांनी दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !