सत्संगाआडून महिलेचे लैंगिक शोषण ! वृंदावनच्या इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा


पुणे (शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026) : अध्यात्म, सत्संग आणि दीक्षेच्या माध्यमातून भक्तांचा विश्वास संपादन करून त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृंदावन येथील कथावाचक इंद्रदेव महाराज यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. आश्रमात दर्शनासाठी गेलेल्या महिलेला मध्यरात्री खोलीत बोलावून अत्याचार केल्यापासून ते व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडल्यापर्यंतचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित महाराजांविरोधात मीरा-भाईंदरमधील काशीमीरा पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

2023 मध्ये प्रवचनातून झाली ओळख
पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2023 मध्ये इंद्रदेव महाराज यांचे प्रवचन पाहिल्यानंतर ती त्यांच्या संपर्कात आली. त्यानंतर दीक्षा घेण्यासाठी सांताक्रुझ येथील सत्संग कार्यक्रमातही सहभागी झाली. हळूहळू महाराजांशी तिचा संपर्क वाढला. वैयक्तिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन देत महाराजांनी तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर महिला वृंदावन येथील सेवाधाम आश्रमात मुक्कामासाठी गेली असताना रात्रीच्या सुमारास महाराजांनी फोन करून स्वतःच्या खोलीत बोलावल्याचे तिने म्हटले आहे. कोणाला विचारल्यास औषध घेण्यासाठी जात असल्याचे सांग, अशा सूचना दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.









आश्रमातील खोलीत जबरदस्ती केल्याचा आरोप
महिलेच्या आरोपानुसार, खोलीत गेल्यानंतर दरवाजा बंद करून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. एवढेच नव्हे तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडल्याचा आणि त्यांचे रेकॉर्डिंग केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्हिडिओंचा वापर करून बदनामीची भीती दाखवत पुन्हा शोषण केल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

तृप्ती देसाईंकडून अटकेची मागणी
या प्रकरणी वृंदावन येथील कथावाचक इंद्रदेव महाराज यांच्याविरोधात मीरा-भाईंदरमधील काशीमीरा पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी संबंधित आरोपीला तातडीने अटक करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात अन्य महिलाही पीडित असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचे जबाब नोंदवावेत आणि सर्व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !