मोक्षाचा समान अधिकार देणारे ज्ञात संत म्हणजे श्री चक्रधर स्वामी : श्रीविष्णू प्रसाद शास्त्री
फैजपूर (9 सप्टेंबर 2024) : वैदिक परंपरेला नाकारून मोक्षाचा समान अधिकार देणारे थोर समाज सुधारक संत महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या जीवनीतून सर्वांग सुंदर, आदर्श आयुष्य कसे जगावे याचा परिपाठ संपूर्ण मानव जातीला दिला आहे. त्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याचे भाग्य आपणास लाभत असल्याचे श्रीविष्णू प्रसाद शास्त्री म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतरण व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र बी.वाघुळदे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.राजेंद्र बी.वाघुळदे यांनी श्री चक्रधर स्वामी यांचे जीवन चरित्र उलगडून त्यांनी मानव जातीला मोक्षप्राप्तीचा मार्ग साध्या, सरळ, सोप्या शब्दात ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाच्या माध्यमातून दिल्याचे सांगितले. सूत्रसंचलन छाया शिरसाळे तर आभार रोहिणी यांनी मानले.

