भुसावळात सोन पाऊलांनी आलेल्या श्री महालक्ष्मीची उत्साहात स्थापना
उज्वला बागुल
भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : गत शनिवारी विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होताच मंगळवार, 10 रोजी श्री महालक्ष्मी (ज्येष्ठा गौरीं) चेही सोन पाऊलांनी आगमन झाले. घरोघरी अत्यंत भक्तीमय वातावरणात स्थापना झाली.
महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींच्या पूजनार्थ जाई-जुई. शेवंती, जास्वंदी, मोगरा, गोकर्ण, करदळी, चाफा आदी फुलांसह आघर्डा, शमी पत्री दुर्वासह फुलहार अर्पण केले जातात तर दुसर्या दिवशी नैवेद्यासाठी पुरण-वरणासह सोळा भाज्या ज्यात पडवळ, आंबटचुका, चाकी, अंबाडी, गंगाफळ, गिलके, दोडके, भोपळा, टमाटे, तोडले, चवळी, गवार, वाल, श्रावणघेवडा, शेपू, पोकळा, ढेमसे यासह अनारसे, करंजी, सांजोरी, मोदक, लाडू, शेव, चिवडा ,चकली, चटण्या, कोशिंबीर तसेच अंबील व पंचामृताचा समावेश असतो. सुवासिनी हळदी कुंकू साजरे करून रात्री जागरण कथा कहाणी करून व्रत करतात. तिसर्या दिवशी गुरुवार रोजी गौरीला मुरड कानवले व दहिभाताचा नैवेद्य केला जातो.

सण-उत्सवामुळे आनंद दुणावला
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व नंतर ज्येष्ठांगौरीचे आगमन यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आले असून आनंदाला उधाण आले आहे. बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांनी गौरी पूजनानिमित्त आपापल्या गावी हजेरी लावल्याने घरातील वडिलधार्या मंडळींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
