यावल येथे सकल धनगर जमातीकडून रास्ता रोको आंदोलन


यावल (24 सप्टेंबर 2024) : यावल शहरातील भुसावळ टी-पॉईंटवर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढण्याच्या मागणीसाठी सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावल शहरात सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ टी पॉईंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धनगर जमात 68 वर्षांपासून हक्कापासून वंचित
काही वेळ रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे. 1956 साली अनुसूचित जमातीच्या यादीत ‘धनगड’ नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. ‘धनगड’ नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक नडली आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, ‘धनगड’ जमात अस्तित्वात नाही मात्र ‘धनगर’जमात अस्तित्वात आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे. ‘धनगड’ नावाची जमात 1956 मध्ये आणि त्या आधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, परंतु ‘धनगर’ जमात अस्तित्वात होती आणि आहे त्यामुळे ‘धनगड’ च्या जागी ‘धनगर’ जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम 342 (1) नुसार आवश्यक आहे. पंढरपूर आणि लातूर येथे मागील 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत. पंढरपूर येथील आंदोलना दरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.


शासनाकडून न्यायाची अपेक्षा
15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते. शासनाने वेळ काढू पण न करता तत्काळ शासन निर्णय काढावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते प्रसंगी रमेश पाचपोळे, रवींद्र कुंवर, सुधाकर धनगर, विठ्ठल धनगर, यशवंत काटकर यांच्यासह मोठ्या संख्येत धनगर बांधवांची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !