भुसावळात विविध मागण्यांसाठी धनगर समाजबांधवांचा रास्तारोको
प्रांताधिकार्यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन
भुसावळ (25 सप्टेंबर 2024) : शहरातील जळगावरोडवर सकल धनगर समाजाने मंगळवारी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याने जळगाव रोडवरील वाहतूक 20 ते 30 मिनिट खोळंबली होती. या आंदोलनानंतर समाजबांधवाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी चंद्रशेखर सोनवणे ,नामदेव सावळे व मनोज मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
अस्तित्वात नसलेल्या जातीला प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. जे अस्तित्वात आहेत ते धनगर आहेत. अश्या स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने तीन वेळा उच्च न्यायालयात दिले आहे.अस्तित्वात नसलेल्या जमातीला राष्ट्रपतींना जाहीर अधिसूचनेद्वारे राज्य घटनेच्या कलम 342(1) अन्वये विनिर्दिष्ट करता येत नाही. त्यासाठी ती जमात त्या राज्यात अस्तित्वात असावीच लागते.त्यामुळे राष्ट्रपतींना धनगड या नावाने धनगर अभिप्रेत होते. राज्य सरकारने त्वरित जीआर काढून धनगर समजाला अ जमातीचे जातप्रमाण पत्र देण्यात यावे या मागणीसाठी राज्यात पंढरपू ,लातूर, नेवासा येथे 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.त् याच्या समर्थनात मंगळवारी सकल धनगर समाज बांधवांनी शहरात रास्तारोको करुन सरकारचे लक्ष वेधले.त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाद्वारा निवेदन देण्यात आले.

रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत
धनगर समाजाकडून वारंवार मागणी होत असतानाही शासनाकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने राज्यभरात आंदोलन केले जात आहे, याच आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जळगावरोडवरील वाहतूक विस्कळीत झाली.




