रेशनकार्ड ऑनलाईन शिबिरांचे आयोजन करा : भुसावळचे शिशिर जावळे यांची अन्नपुरवठा मंत्र्यांकडे मागणी


भुसावळ (26 सप्टेंबर 2024) : केंद्र सरकारने नुकताच आयुष्मान भारत योजनेंतर्गत 70 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तींना आयुष्मान भारत (आरोग्य विमा) योजने अंतर्गत 5 लाखापर्यंत कव्हर जाहीर केले आहे. पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जाणार असून त्याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक व 4.5 कोटी कुटुंबीयांना फायदा होणार आहे. गतवर्षी महात्मा ज्योतीबा फुले जन-आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती 1.5 लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली. आता 1 जुलैपासून सर्व नागरिकांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी डिजिटल रेशनकार्ड आवश्यक असून ते नागरिकांना मिळण्यासाठी रेशनकार्ड शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी भुसावळचे शिशिर जावळे यांनी अन्नपुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.

वशिल्याने रेशनकार्ड मिळत असल्याचा आरोप
या योजनेचा लाभ केशरी, पिवळे तसेच पांढर्‍या रेशन कार्डधारकांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या संबंधित नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करून त्यावर 12 अंकी क्रमांक असलेले डिजिटल रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्डच्या आधारावर तहसील कार्यालयाकडून या योजनेसाठी लाभार्थी रुग्णालयात भरती होण्यासाठी दाखला दिला जातो. त्याकरिता भुसावळ शहर आणि तालुका परिसरातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी फेर्‍या माराव्या लागत आहेत. विशिष्ट नागरिकांना मात्र वशिल्याने त्वरित रेशनकार्ड ऑनलाईन करून मिळत आहेत मात्र नागरिकांना तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, भुसावळ यांच्याकडून कुठलेही मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.

अजूनही भसावळ शहर आणि तालुक्यातील बहुसंख्य रेशनकार्ड धारकांचे रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे त्यावर बारा अंकी नंबर नसल्यामुळे ते या आरोग्य योजनेच्या लाभांपासून वंचित राहत आहे. भुसावळ तहसील कार्यालयाकडून शहर आणि तालुक्यातील सर्वच रेशनकार्ड ऑनलाईन करून त्याना 12 अंकी नंबर मिळावा याकरीता आपण याबाबत तातडीने युद्ध पातळीवर भुसावळ शहर आणि ग्रामीण परिसरात रेशन कार्ड ऑनलाइन शिबिराचे जास्तीत-जास्त ठिकाणी आयोजन करावे तसेच भुसावळ तहसील कार्यालय येथे नागरिकांनी आजपावेतो रेशनकार्ड वर 12अंकी क्रमांक मिळण्यासाठी जे-जे अर्ज प्रस्तावित असतील त्यांचे अर्ज त्वरित निकाली काढावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !