बोदवडला परतीच्या मुसळधार पावसामुळे लाखो रुपयांचा मका सडला ; नाले ओसंडले

शेतकरी संकटात : शाळांभोवती तळे साचल्याने विद्यार्थ्यांना दिली सुटी


बोदवड (27 सप्टेंबर 2024)  : शहरासह परिसरात परतीच्या मुसळधार पावसामुळे हाहाःकार उडाला असून गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळा सोडून देण्यात आल्या तर तीन तासातील पावसामुळे शेतीचे बांध फुटल्यानंतर नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बोदवड शहरातील न.हं.रांका हायस्कूल, ज्युनियर व सिनियर काँलेज, राष्ट्रीय शिक्षण संस्था गोरक्षण संस्थेच्या परिसरात नाल्यांचे पाणी शिरल्यानंतर सतर्कता म्हणून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

शेतकर्‍यांचा हिरावला घास
मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकर्‍यांकडील मका पावसामुळे भिजला असून कणसे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, कृषी विभागाने गुरुवार, 26 रोजी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असल्यास व पीक विमा भरला असल्यास 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे फोटोसह ऑनलाईन तक्रारीचे आवाहन केले आहे.

बोदवड तालुक्यातही फटका
बोदवड तालुक्यातील मनुर बु.॥ येथील शेतकरी उल्हास वाघ, सर्वेश पाटील, वैभव पाटील, रामा कोळी, सुभाष डी.के., रवी पाटील, भास्कर बोदडे, उल्हास वाघ, रामा काळे तसेच बोदवड येथील धनराज पाटील यांच्या शेतातील मका पाण्यात वाहिला तर कपाशीचे सुध्दा मोठे नुकसान झाले. त्याशिवाय येवती, जामठी, कुर्‍हा, राजुरा, शेलवडसह बहुतांश तालुक्यातील शेतकर्‍यांनाही नुकसानीचा सामना करावा लागला.

तलावालगतची शेती पाण्यात
तपोवनमधील तलावालगतची शेती पाण्याखाली बुडाली तर शहरातील मधोमध असलेला हिरवा तलाव तुडुंब भरल्याने तो फुटण्याची शक्यता पाहता नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी मुख्याधिकारी गजानन तायडे यांना कल्पना दिल्यानंतर तलावाचे पाणी जेसीबीने प्रवाह फिरवून नाल्यात काढण्यात आले. मेहतरवाडा परिसरातील पुलावरून पाणी वाहिले व काही वेळेसाठी गावातील दोन्ही बाजूंचा संपर्क तुटला मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !