पालकांचा पाल्यांसोबत नियमित संवाद आवश्यक : समुपदेशक आरती चौधरी

भुसावळातील ताप्ती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुड व बॅड टचचे धडे


भुसावळ (30 सप्ट 2024)  : अनेकदा पालकांना आपल्या पाल्यांसाठी वेळ नसतो. त्यांच्यामध्ये संवाद होत नाही त्यामुळे मुलांना किंवा मुलींना काय त्रास होतोय ते त्यांना समजत नाही त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत थोडा वेळ घालवायला हवा. त्यांच्यासोबत बोलायला हवे. त्यांच्या भावना व्यक्त होणे आवश्यक असल्याचे मत समुपदेशक आरती चौधरी यांनी येथे व्यक्त केले. लहान मुला-मुलींबरोबर समाजात घडणार्‍या दुर्दैवी घटना पाहता इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे ‘गुड टच बॅड टच’ व ‘सेल्फ डिफेन्स’ (स्वसुरक्षा) या कार्यक्रमाद्वारे मुलांमध्ये जागरूकता व आत्मविश्वास निर्माण केला जात आहे. शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नुकताच कार्यक्रम झाला. याप्रसंगी समुपदेशक आरती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षणासोबत सुरक्षित होणे महत्त्वाचे
समुपदेशक आरती चौधरी म्हणाल्या की, आपली भावी पिढी शिक्षीत होत असताना सुरक्षित असणे महत्वाचे आहे. एखाद्याने प्रेमाने काही खायला दिले किंवा एखादी आवडती गोष्ट दिली तर मुले किंवा मुली लगेच आनंदी होतात. तुमच्या या भुलण्याचा इतर लोक गैरफायदा घेऊ शकतात, हे समजावून सांगणे ही पालक, शिक्षक व समाजाची जवाबदारी आहे. मुलींना सांगा की, जर एखाद्या बाहेरच्या किंवा अज्ञात व्यक्तीने एखादी गोष्ट देऊन किंवा तुम्हाला एखादे मोठे आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी जागरुक रहा, असे आरती चौधरी म्हणाल्या. गुड व बॅड टचबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करीत मुला-मुलींना जागृत केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीच्या अध्यक्षा मीनाक्षी धांडे, प्रोजेक्ट चेअरमन सुनीता पाचपांडे, ताप्ती स्कूलच्या प्रीन्सीपल निना कटलर उपस्थित होत्या. प्रास्ताविक अध्यक्षा मीनाक्षी धांडे यांनी केले. आपल्या देशाच्या भावी पिढीची सुरक्षितता, काळजी घेणे आवश्यक असल्याचा उद्देश ठेवून आयोजन करण्यात आल्याचे धांडे म्हणाल्या. एक हजारावर मुलांची प्रसंगी उपस्थिती होती. प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीच्या हेमलता सोनार, रेवती मांडे, योगीता वायकोळे, अदिती भडंग उपस्थित होत्या.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !