मुक्ताईनगरात घटस्थापना दिनी श्री संत मुक्ताई जन्मोत्सव
श्री दुर्गा सप्तशती पारायण सेवा सोहळ्याची जय्यत तयारी : पारायणात सहभागाचे आवाहन
मुक्ताईनगर (01 ऑक्टोबर 2024) : गुरुवार, 3 पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन असून हा जमोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसराच्या वतीने हजारो सेवेकर्यांतर्फे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ (कोथळी), श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे दुर्गा सप्तशती पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, जुने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांच्यासह श्री.स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी परिवार,मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्तशती पारायण सेवेने जन्मोत्सव होणार साजरा
दिंडोरी दरबार प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील हजारो महिला व पुरुष तसेच युवक व युवती सेवेकर्यांनी परम पूज्य गुरुमाऊली श्री अन्नासाहेब मोरे यांच्या आदेशाने जगत जननी आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा जन्मोत्सव तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर आदिशक्ती मुक्ताई मंदिरात येणे शक्य नाही. अशा सेवेकर्यांनी घरोघरी सप्तशती पारायण करून साजरा करावा. नैसर्गिक आपदा व संकटे यांना दूर करून शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी येणार्या पिकांचे संरक्षण व्हावे, असा विश्वकल्याणाचा संकल्प करण्यात येणार आहे व आदिशक्ती मुक्ताई साहेबांना सप्तशती पारायण प्रसंगी साकडे घालण्यात येणार आहे.