भुसावळात राष्ट्रवादी पार्टीचे शेतकरी जनआक्रोश आंदोलन : वाहतूक ठप्प
भुलथापा देणार्या सरकारला शेतकरीच जागा दाखवतील : अॅड.रवींद्र पाटील
भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) : अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी, भारतीय हवामान विभागच्या वतीने अधिकृत 135 टक्के सरासरी पाऊस जास्त झाल्याचे झाल्याने सरसकट अनुदान जाहीर करावे, 7.5 एचपी पर्यंत कर्जमाफी न देता सरसकट वीज माफी, राजकीय दबावातून प्रशासन दडपशाही करून पाणीपुरवठा, आरोग्याच्या समस्यांकडे डोळेझाक करीत असल्याने त्याबाबत दखल घ्यावी यासह अन्य न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षातर्फे शुक्रवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांनी यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला.


या मागण्यांसाठी आंदोलन
कापूस, सोयाबीन, मका सोबत खरीपातील सर्व पिकांना तातडीने हमीभाव जाहीर करावा, पीक पेरे तथा अनुदान संदर्भात विविध नोंदी उतार्यावर होत नाही नसताना दुसरीकडे शासन साक्षांकित प्रती स्टॅम्पच्या माध्यमातून जमा करून कोट्यवधींचा महसूल जमा करीत असल्याने शेतकरी मात्र लााभपासून वंचित राहत आहे, पीक विम्याचे पैसे सर्व शेतकर्यांना अजून मिळालेले नसल्याने ते तत्काळ द्यावेत, विविध अनुदान जाहीर केल्याचे सोंग केले जात असलेतरी रक्कम मात्र मिळाली नसल्याने तत्काळ सर्व जाहीर केलेले अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी रास्ता रोको करीत शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
आता सरकारला शेतकरीच जागा दाखवतील
शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील म्हणाले की, शेतकर्यांचे अनेक प्रश्न असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार त्यांना कुठल्याही स्वरूपाची मदत न करता शेतकरी बांधवांना थूलथापा देत आहे. हा प्रकार म्हणजे शेतकर्यांची खिल्ली उडविणे आहे. शेतकर्यांच्या कष्टाशी त्यांच्या जगण्याची खेळणार्या सरकारला येणार्या निवडणुकीत शेतकरी बांधव नक्कीच जागा दाखवतील, असेही ते म्हणाले. शेतकर्यांना आर्थिक व अन्य मदत करता येत नसेल तर घरी बसा परंतु शेतकर्याची पिळवणूक करू नका . असा इशारा त्यांनी सरकारला दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मनोगतात राज्य सरकार शेतकरी व कष्टकरी वर्गाची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले.
आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत
शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील चौकात तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता एकत्र आले व त्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकरी आक्रोश आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे भुसावळ शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. याप्रसंगी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलकांनी सरकारला खडे बोल सुनावले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.डॉ.जतीन मेढे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, डॉ.राजेश मानवतकर, रामदास सावकारे, भीमराज कोळी, विशाल ठोके, संगीता भामरे, जळगाव महानगरचे सामाजिक न्याचचे अध्यक्ष रमेश बार्हे, आकाश कुरकुरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्यावर ठिय्या आंदोलन संपल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे सूत्रसंचालन वाय.आर पाटील यांनी केले.




