लोकसभेच्या निवडणुकीनंतर भुसावळ तालुक्यात 30 हजार मतदार वाढले
भुसावळातील पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील
भुसावळ (05 ऑक्टोबर 2024) : लोकसभा निवडणूक आटोपल्यावर मधल्या काळात मतदारांनी अर्ज करीत मतदार यादीत नाव समाविष्ठ करून घेतल्याने भुसावळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ही तीन लाख 14 हजार 23 इतकी आहे. लोकसभेच्या वेळी दोन लाख 85 हजार इतकी मतदार संख्या होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महसूल यंत्रणा कामाला लागल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन
प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी एक वाजता प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी प्रांत पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, मतदार यादीत नाव नोदणी सुरू आहे. मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत नसल्यास नोंदवून घ्यावीत. ऑनलाईन सुध्दा मतदार नोंदणी सुरू आहे. स्थिर पथक, भरारी पथक यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहिता प्रमुख म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी हे शहरी भाग तर गटविकास अधिकारी हे ग्रामीण भागासाठी प्रमुख राहतील. मतदारांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सुध्दा मतदान कक्ष सुरू केला जाणार आहे. 36 सेक्टर अधिकारी नियुक्त केले आहे.

तीन लाख 14 हजार मतदार
भुसावळ विधानसभेसाठी तीन लाख 14 हजार 23 मतदार आहे. यात 40 तृतीय पंथी, एक लाख 53 हजार 75 महिला मतदार तर एक लाख 60 हजार 908 पुरूष मतदार आहे. दिव्यांग मतदारांची संख्या दोन हजार 599 इतकी आहे. ज्येष्ठ नागरिक मतदार जे 85 वयापेक्षा जास्त असलेले मतदार तीन हजार 173 आहे. 18 ते 26 वयोगटातील मतदारांची संख्या 6 हजार 743 इतके आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर
गेल्या वेळेस विधानसभेला 48.66 टक्के मतदान झाले होते, यंदा त्यात वाढ करून ही संख्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे यासाठी आयोगाकडून जनजागृती केली जाणार आहे. मतदानाचे साहित्य तहसील कार्यालयातून दिले जाईल आणि जमा केले जाईल. मतमोजणी सुध्दा तहसील कार्यालयाच्या गोदामात होणार आहे. असे प्रांत पाटील व तहसीलदार लबडे म्हणाल्या.




