ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक शिंदे-फडणवीसांच्या मंत्री मंडळात ! : जळगावात खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
People protecting drug trafficker Lalit Patil in Shinde-Fadnavis’ cabinet! : Attack of MP Sanjay Raut in Jalgaon जळगाव (06 ऑक्टोबर 2024) : पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन खोट बोलतात मात्र गुजरामध्ये पकडलेल्या ड्रग्सवर मोदी बोलत नाहीत. अकोल्यात अंमली पदार्थांच्या बाबतीत त्यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेस पक्ष अंमली पदार्थाच्या पैशांवर निवडणूक लढतोय, असे त्यांनी सांगितले मात्र त्याबाबत काँग्रेस पक्ष उत्तर देईल मात्र पंतप्रधानांनी गुजरातमधील अदाणी यांच्या मुंद्रा पोर्टवर पकडलेल्या साडे तीन लाख कोटींच्या ड्रग्जवर भाष्ण केले नाही. 100 लाख कोटींचे ड्रग्ज तेथून बाहेर पडून देशभरात पसरले आहे, त्यावरही ते गप्प आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी जळगावात केली.
पुण्यात एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील निवडणूक ते हरत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या निवडणुका होणार आहेत. हरियाणापेक्षा अधिक दणदणीत पराभव त्यांचा महाराष्ट्रात होणार आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.

निवडणूक काळात देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय, अशी भीती वाटते. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे आणि किती वेळा जावे यासंदर्भात काही शिष्टाचार आहे. पुण्यात एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन करतात, हे त्यांना कसे जमते हे माहीत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.
पोहरादेवीच्या कार्यक्रमात पायाशी बसणार लोक कोण ?
राऊत म्हणाले की, ललित पाटील प्रकरणावर मोदींनी बोलले पाहिजे. या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक शिंदे आणि फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात आहेत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर संजय राठोड होते. त्यांच्यावर एका महिलेच्या संशयास्पद मृत्येचे आरोप आहेत. याचा तपास बाकी आहे. त्या महिलेच्या घरात मृत्युनंतर नशेचे पदार्थ सापडले होते. या मंत्र्याचे तिथे येणे-जाणे होते, असा दावा राऊत यांनी केला. तुम्हाला अंमली पदार्थाची चिंता आहे, पण पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते, अश टीकाही त्यांनी केली.
राम रहिमला सोडवण्यासाठी मोदींचे विशेष प्रयत्न
हरियाणात निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या राम रहिम याला 12 वेळा पॅरोलवर सोडले आहे. त्याच्याही आश्रमात महिलांवर अत्याचार, खून अशा घटना घडल्या. अंमली पदार्थ सापडले. अशा माणसाला सोडण्यासाठी पंतप्रधान मोदी विशेष प्रयत्न करतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, मोदी काल ठाण्यात म्हणाले, मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे, गोड बातमी काय होती, तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यासाठी आम्ही सगळेच मागील 20-25 वर्षांपासून प्रयत्न करत होतो. तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरत आहात, त्यामुळे गोड बातमी घेऊन आला आहात, असा टोला राऊत यांनी लगावला.
राज्यातील पत्रकार पाकीट संस्कृतीत अडकणार नाही
अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या संस्कृतीत खोके, पाकीट संस्कृती सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मिडिया विकत घेण्याची निती सुरू केली आहे. पत्रकारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा महाराष्ट्र आहे. राज्यातील पत्रकार पाकीट संस्कृतीत अडकणार नाही, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.




