पत्रकारांच्या सात तासांच्या आंदोलनानंतर बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरूवात

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी धारेवर : आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन


सावदा (08 ऑक्टोबर 2024) : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आंदोलनात आश्वासन मिळूनदेखील याची पूर्तता न झाल्याने स्थानिक पत्रकारांनी मंगळवारी तब्बल सात तास महामार्गा रोखून धरल्यानंतर वाहतूक खोळंबली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार जोपर्यंत आंदोलन स्थळी भेट देऊन काम मार्गी लावणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर शिवाजी पवार व मक्तेदार आंदोलनस्थळी आले व तत्काळ कामाला सुरूवात करण्यात आली. सावदा येथील तापी सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन पत्रकार संघटना व विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुकारण्यात आले.

नाकर्त्या प्रशासनाचा पत्रकारांकडून धिक्कार
मंगळवारी सकाळी सात वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यानंतर अनेक राजकीय पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी नाकर्त्या प्रशासनाचा जाहीर धिक्कार असो, बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग मार्गी लागलाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी, वंचित बहुजन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, धनंजय चौधरी, कोचूर येथील शेतकरी संजय पाटील, सावदा शहराचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन, सय्यद अजगर, पंकज येवले, फिरोज खान पठाण, सुधाकर पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, कुशल जावळे, सुनील नारखेडे, फैजपूर येथील नगरसेवक कलीम मेंबर, भरत लीदुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला तर अ‍ॅड.रोहिणी खडसे, श्रीराम पाटील, सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अनिल चौधरी यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी चर्चा करून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला तसेच सावदा परिसर पत्रकार संघानेही आंदोलनाला पाठिंबा दिला.

शिवाजी पवार यांना विचारला जाब
आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी भेट दिली. यावेळी आंदोलक कमालीचे आक्रमक झाले व त्यांना जाब विचारत या रस्त्यावर किती रुपयांची तरतूद आहे? किती बिले काढण्यात आली ? व रस्ता कधीपर्यंत पूर्ण होणार आहे ? आदी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याने शिवाजी पवार हे पुरता निरुत्तर झाले.

80 कोटीच्ंया रस्त्यावर तीस कोटी बिल अदा
बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गासाठी गुजरात सीमेजवळील तळोदा येथून ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत चोरवड गावाजवळ तब्बल 80 कोटी रुपये मंजूर असून यात खड्डे बुजणे व ठिकठिकाणी प्लास्टर मारणे आदी कामे करण्यात येणार आहे. या कामासाठी आतापर्यंत 30 कोटी रुपयांचे बिल मक्तेदाराला बिले अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कामाची डेडलाईन संपली तरी नवीन डेडलाईन
जुलै 2024 ही कामाची अंतिम दिनांक असल्याने तिथपर्यंत काम करणे मक्तेदाराला बंधनकारक होते तरीदेखील मक्तेदाराने काम पूर्ण न केल्याने आंदोलन उभारण्यात आले. आता प्रशासनाने डिसेंबर 2024 अशी नवीन डेडलाईन मक्तेदाराला दिली.

प्रकल्प संचालक व मक्तेदाराचे लेखी आश्वासन
सावदा येथील रावेर रोडवर आंदोलनाला मंगळवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली यानंतर अनेक पदाधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार व मक्तेदार भांबरे यांनी लेखी आश्वासन देत दोन दिवसात सावदा व पंधरा दिवसात चोरवडपर्यंत रस्त्याचे काम मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिले आहे.

अखेर कामाला सुरूवात
जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे होत नाही हा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाला आंदोलकांसमोर नमते घ्यावे लागले. सावदा-फैजपूरमधील साईबाबा मंदिराजवळ गटारी व खडीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दुपारी अडीच वाजता आंदोलन मागे घेतले. दरम्यान सावदा-रावेर महामार्गावरील आंदोलनामुळे रावेरकडे जाणारी वाहतूक मस्कावदमार्गे तर फैजपूरकडे जाणारी वाहतूक चिनावलमार्गे वळवण्यात आल. यावेळी अवजड वाहनांच्या रांगाच्या रांगा महामार्गांवर दिसून आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !