भुसावळात पालिका अॅक्शन मोडवर : झेंडे व बॅनर जप्त
उर्वरीत भागात सोमवारपासून मोहिम : आचारसंहितेपूर्वीच कारवाई
Bhusawla Municipality on action mode : Flags and banners confiscated भुसावळ (12 ऑक्टोबर 2024) : लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने पालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील यावल रस्त्यावर पालिकेने शुक्रवारी कारवाई करीत राजकिय पक्षाचे दहा व विनापरवानगीने लावलेले 26 असे एकूण 36 बॅनर व राजकिय पक्षाचे 23 झेंडे जप्त केले तर शहरातील उर्वरित भागात सोमवारी कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आचारसंहितेपूर्वीच शहरात कारवाई
नगरपालिका प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरुन आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वीच शहरातील राजकिय पक्षाचे बॅनर व झेंडे हटविण्याच्या सूचना मिळाल्यानंतर प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील आणि मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालिकेच्या पथकाने शुक्रवारी यावल नाका ते सातारे पुल व गांधी पुतळा ते सतारे चौक या जळगाव मार्गावरील अनधिकृत बॅनरवर कारवाई केली. राजकीय पक्षाचे 10, विनापरवानगीने लावलेले 26 असे एकूण 36 तसेच राजकिय पक्षाचे 23 झेंडे काढण्यात आले. तर पथकाकडून सोमवारी जामनेररोड, खडकारोड, वरणगावरोड व मुख्य बाजारपेठेत कारवाई केली जाणार आहे. लिपिक अनिल भाकरे, राजेंद्र चौधरी, गोपाळ पाली, धर्मेद्र खरारे आदी कर्मचार्यांनी मोहिम राबवली. दरम्यान, अन्य भागात सोमवारी मोहिम राबवली जाईल व संबंधितांनी यापूर्वीच झेंडे वा बॅनर काढावे अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

