सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधनासोबत पर्यावरण संवर्धनासाठी व्हावे चिंतन $ अ‍ॅड.आशिष जाधवर

भुसावळात संघाच्या दसरा उत्सवात अ‍ॅड.आशिष जाधवर यांचे मत


भुसावळ (13 ऑक्टोबर 2024) : मुळात स्वतंत्र असलेला आपला भारत देश, अनेक परकीय आक्रमण देशात होत असतांना हिंदू समाजाच्या विघटनामुळे पारतंत्र्यात गेला म्हणून समाजाचे विघटन रोखणारी व सामाजिक समरसता अंगीकारणारी कार्यपद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 99 वर्षांपूर्वी विकसीत केली, असे प्रतिपादन देवगिरी प्रांताचे कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.आशिष जाधवर यांनी केले. प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
उत्सवात सेवानिवृत्त न्यासुरेश अग्रवाल, भंते धम्मज्योती, भुसावळ जिल्हा संघचालक डॉ. विजय सोनी व भुसावळ शहर संघ चालक डॉ. रविंद गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शस्त्र पूजन हा संस्काराचा भाग
अ‍ॅड.जाधवर म्हणाले की, विजयादशमी होणारे शस्त्रपुजन हा कार्यक्रम नसून आपल्या संस्काराचा भाग आहे. संस्कृतीचे जतन करण्यासाठी कौटुंबिक संस्कार वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. कोरोना काळानंतर जग भारताकडे प्रबळ राष्ट्र म्हणून पाहते. या धरतीला माता माननार्‍या आपण सर्वांनी जागतिक स्तरावरून होणार्‍या पर्यावरणाच्या समस्येवर आपल्या स्तरापासून चिंतन करावे. चिंतन जेव्हा देशाच्या सर्व सीमा स्तरापर्यंत पोहोचणे हा खर्‍या अर्थाने शताब्दीचा कार्यविस्तार असेल, असे विचार जाधवर यांनी मांडले.

सज्जनशक्तीचे एकत्रीकरण गरजेचे
खडका येथील भंते धम्मज्योती जी यांनी ही कार्यक्रमात आशीर्वाद स्वरूप संवाद स्वयंसेवकांशी साधला. रा.स्व.संघाचे कार्य हे देशाला एक सूत्रात बांधनारे असून, आपण सर्व मानवतेकडे वाटचाल करणारे आहोत. काही जण राष्ट्रासाठी अहितकारक प्रयत्नांनी समाजात द्वेष पसरवण्याचे कार्य करतात अशावेळी आपण सर्व गुण्यागोविंदाने नांदयला हवे व यासाठी सज्जनशक्तीचे एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पथसंचलनावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी
शहरातील मिरवणूक मार्गावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन निघाले. या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी संचलनावर पुष्पवृष्टी केली. दरवर्षाप्रमाणे आहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या प्रांगणातून संचलनाला सुरवात होवून समारोप प्रभाकर हॉलमध्ये करण्यात आला.


कॉपी करू नका.