भुसावळात ईव्हीएम सुरक्षेचा जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी घेतला आढावा
स्ट्राँग रूमसह मिडीया आचारसंहिता कक्षाची पाहणी : अधिकार्यांशी संवाद
Collector Ayush Prasad reviewed EVM security in Bhusawal भुसावळ (22 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाला भेट दिली. तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली तसेच सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामाच्या छताला गतवेळी दिवाळीत पेटता फटाका पेटल्यानंतर किरकोळ लागलेली आग पाहता यंदा अशा प्रकारे कुठलीही दुर्घटना होणार नाही यासाठी गोदामाच्या छतावर पत्रे वाढवण्याच्या तसेच निकाल हाती येई नाही तोपर्यंत पालिकेचा 24 तास अग्निशमन दलाचा बंब तैनात करण्याच्या सूचनाही यावेळी केल्या.
पत्र्याचे शेड वाढवण्याच्या सूचना
महाराष्ट्रात 20 नोव्हेंरब रोजी होणार्या विधानसभा निवडणुका पाहता जिल्हा व स्थानिक प्रशासनही गतिमान झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी सोमवारी अधिकार्यांसह भुसावळ तहसील कार्यालय आवारात ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी सीसीटीव्ही सुस्थितीत आहेत वा नाही, बंदोबस्त पुरेसा आहे वा नाही? याची पाहणी केली. ईव्हीएम ठेवण्यात येणार्या गोदामाला पाणी गळती, वा आगीची काही घटना घडू नये यासाठी पत्र्याचे शेड वाढवण्याच्या सूचना प्रांताधिकार्यांना त्यांनी केल्या. गत दिवाळीत पेटता फटाका वा रॉकेट ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामाच्या छतावर पडल्यानंतर किरकोळ आग लागली होती मात्र अशी पुन्हा न घडण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी करीत निकाल लागेपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन (बंब) 24 तास तैनात असावे, अशी सूचना त्यांनी केली. तहसील कार्यालयात ईव्हीएम सुरक्षेसाठी पोलिसांची छावणी उभारण्यात आली असून जिल्हाधिकार्यांनी तेथे ठेवलेल्या रजिस्टारची तपासणी करीत कुणी-कुणी भेटी दिल्या याबाबतची माहिती जाणली.

पथनाट्यातून मतदान जनजागृती
भुसावळातील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण तहसील प्रवेशद्वारासमोर केले. यावेळी
शिक्षक व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदानाचा टक्का वाढवण्यावर प्रशासनाचा भर असून त्या दृष्टीने जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जात आहेत.

विविध कक्षांना भेट : अधिकार्यांशी संवाद
प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुष प्रसाद यांनी निवडणुकीसंदर्भातील विविध कक्षांना भेट दिली तसेच सीसीटीव्हीची तपासणी करीत सुरक्षेचा आढावा घेतला. आचारसंहिता कक्ष तसेच मिडीया कक्षाची माहिती घेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या गाईड लाईनचे पालन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोडल व सेक्टर अधिकार्यांची बैठक घेण्यात आली व निवडणूक आयोगाच्या गाईड लाईन जिल्हाधिकार्यांनी सांगत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपला पर्सनल नंबर शेअर केला. वेळेच्या आत काम करण्याच्या सक्तीच्या सूचना व आदेश त्यांनी दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, नायब तहसीलदार अंगत असटकर, मुख्याधिकारी राजेंद्र फातले आदींची उपस्थिती होती.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी रावेरसह भुसावळला भेट दिली. भुसावळातील ईव्हीएम सुरक्षेचा त्यांनी यंत्रणेकडून आढावा घेत बंदोबस्ताची पाहणी केली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना त्यांनी निवडणूक काळात नागरिकांकडील शस्त्रे जमा करण्यासह उपद्रवींवर अधिकाधिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्याच्या सूचना केल्या. मतमोजणी होणार्या स्थळाची त्यांनी पाहणी करीत बंदोबस्ताबाबत माहिती जाणली.




