मोठी बातमी : शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक ; संजय राऊत


मुंबई (23 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीतील जागांचा तिढा बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुटलेला नसताना उद्धव ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली मात्र खासदार संजय राऊत यांनी ती प्रशासकीय चूक असल्याचे म्हणत उद्या अर्थात गुरुवारी सुधारीत यादी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेनंतर काही जागांवर आता उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ‘लोकमत’ ने याबाबत ऑनलाईन वृत्त दिले आहे.

फार्म्यूला ठरला : प्रत्येकी 85 जागा
मविआतील तीन प्रमुख पक्ष काँग्रेस-शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 85-85-85 अशा जागा लढवणार आहे. 270 जागांवर तिन्ही पक्षात सहमती झाली असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना सोडली जाईल. त्यांच्याशी गुरुवारी सकाळपासून चर्चा होईल असं संजय राऊतांनी मविआच्या पत्रकार परिषदेत सांगितले.


शिवसेना यादीतील उमेदवार बदलाचे संकेत
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरुस्त्या आहेत. ते कशाप्रकारे झालं, काय झालं, आमची प्रशासकीय चूक कशी काय होऊ शकली याबाबत आमचे अनिल देसाई आहेत ते या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहतात. पण गुरुवारी आम्ही बसणार आहोत. त्यावर काही नव्याने चर्चा होतील, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे त्यामुळे पहिल्या यादीतील काही उमेदवार बदलले जाऊ शकतात असे संकेत राऊतांनी दिले आहेत.

तसेच 288 जागांचा प्रश्न सुटला असं जेव्हा आम्ही सांगतोय, ते अत्यंत जबाबदारीने सांगतोय. 18 जागा मित्रपक्षाला दिल्या जातील. त्यात आमच्यातील कुणाचा दावा असला तर त्यातून काही मार्ग काढला जाईल. आमची जी यादी चुकून आली आहे, त्यात काही शेकापच्या जागा आहेत. त्यावर शेकापची चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादीकडे आहेत, त्या मित्रपक्षांशी संबंधित आहेत. काही काँग्रेसकडे एखादी दुसरी जागा आहे त्यावर चर्चा होईल असं संजय राऊतांनी म्हटलं.

पहिली यादी अंतिम नाही?
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पहिल्या यादीबाबत पत्रकारांनी विचारले असता ज्या ज्या जागांवर जे काही दुरुस्ती असतील त्या करून उद्या स्पष्ट होईल, असे म्हटलं आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !