शिवसेनेच्या ठाकरे गटाचे धक्कादायक विधान : मुंबादेवीत बाहेरचा ‘माल’ चालणार नाही
शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांचा संताप
मुंबई (01 नोव्हेंबर 2024) : ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी एका महिला उमेदवाराविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर आपल्याला ‘माल’ म्हणून संबोधल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अरविंद सावंत यांनी केला माल म्हणून उल्लेख
शायना एनसी यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी अरविंद सावंत यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये अरविंद सावंत शायना एनसी यांचा उल्लेख कथितपणे माल म्हणून करताना ऐकू येत आहेत. मुंबादेवीमध्ये बाहेरचा माल चालणार नाही. इथे इथलाच माल चालणार अमिन पटेल, असे सावंत म्हणाल्याचे शायना एनसी यांनी दावा केला आहे.

शायना एनसी म्हणाल्या, ठाकरे गटाच्या नेत्याने राजकारणात सक्षम असणार्या एका महिलेचा उल्लेख माल म्हणून केला. यावरून त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट होते. त्यांनीच ते कुठले आहेत हे सांगावे. याच अरविंद सावंत यांच्यासाठी मी प्रचार केला होता. ते आमच्या बळावर निवडून आले होते. त्यांनाच विचारा ते कुठले आहेत? मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईकरांची लाडकी आहे. मी मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत किंवा उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.




