जळगावात दोन लाखांची खंडणी मागत चाकू भिरकावला
जळगाव (1 डिसेंबर 2024) : मुलांना महाविद्यालयात सोडण्यासाठी जात असताना दुचाकी थांबवित एकाने दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर हातातील चाकू भिरकावित शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवार, 29 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अक्सानगर परिसरात आय.के.रिक्षास्टॉपजवळ घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार अजिज बाबा मुलतानी (रा.गेंदालाल मिल) याच्या विरोधात गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला.
असे आहे खंडणी प्रकरण
शेख अकबर शेख अब्बास (वय 33,रा. अक्सानगर) हे व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनर्वाह करतात. ते शुक्रवारी मुलांना महाविद्यालयात सोडण्यासाठी दुचाकीने जात होते. आय.के.रिक्षा स्टॉपजवळ अजिज मुलतानी यानी दुचाकी थांबविली. त्यानंतर शेख अकबर यांच्याकडे काही एक कारण नसताना दोन लाखांची मागणी केली. हातातील चाकू शेख अकबर यांच्या दिशेकडे भिरकावून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर शेख अकबर यांनी पोलिसात कैफियत मांडली. याप्रकरणी अजिज शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोनि दत्तात्रय निकम यांनी जावून प्रकार लक्षात घेतला. गुन्ह्याचा तपास ग्रेडपोउपनि संजय पाटील हे करीत आहेत.

