बांभोरी शिवारातील त्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज
The forest department estimates that the leopard in Bambhori Shivara died of starvation. कासोदा (8 डिसेंबर 2024) : बांभोरी शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा उपासमारीने मृतयू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. शनिवारी सकाळी बांभोरी शिवारातील भागवत त्र्यंबक चौधरी यांच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानंतर वन विभागाने धाव घेत बिबट्यास ताब्यात घेतले व त्यानंतर शवविच्छेदनासाठी एरंडोल येथे पशुवैद्यकीय विभागाकडे सुपूर्द केले होते. अन्न न मिळाल्याने, उपासमारीमुळे बिबट्या मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
परिसरात बिबट्यांचा वावर
7 रोजी सकाळी शेतमालक भागवत त्र्यंबक चौधरी हे नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. एरंडोल वन विभागाच्या अधिकार्यांना कळवण्यात आल्यानंतर वनविभागाने बिबट्या ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी हलवला. उपासमार, अपेक्षित अन्न, पाण्याचा अभाव यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाचे बळवंत पाटील, उपवनसंरक्षक विजय माळी यांनी दिली. दरम्यान मृत बिबट्या आढळल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. दरम्यान मृत बिबट्या आढळून आल्याने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. शेतात जातांना सामूहिकपणे व स्वसंरक्षणसाठी आवश्यक साहित्य सोबत असू द्यावे. सध्या शेतीच्या हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.


