आंध्र राज्यातील व्यापार्‍याला मारहाण करीत लुटले : हलखेड्यातील टोळी नशिराबाद पोलिसांच्या जाळ्यात


Businessman from Andhra State beaten and robbed : Gang from Halkheda caught by Nashirabad police नशिराबाद (11 डिसेंबर 2024) : आंध्रप्रदेशातील व्यापार्‍याला स्वस्तात कॉपर तारांचे भंगार देण्याचा बहाणा करीत पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करीत लूटले होते. ही घटना सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली होती. नशिराबाद पोलिसांनी हलखेडा, ता.मुक्ताईनगर येथील पाच जणांच्या कुविख्यात टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्या अटकेने जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची आशा आहे. आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये प्रधूम गुलाब पवार (22), अमजीत भास्कर भोसले (वय 35), पप्पू गुलाब पवार (23), सोना उर्फ सोन्या गुलाब पवार (28), क्रिश उर्फ किरेश रफिक पवार (24, सर्व रा.हलखेडा ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
दुर्गा वेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा (41, रा.वेदी, ता.पेदापांडू मंडल, जि.वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) हे कॉपर तारांचे भंगार खरेदी-विक्री करतात. गत आठवड्यात त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅपवरून कॉपरच्या भंगार विक्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जळगाव तालुक्यातील भादली गावातील एकाशी मोबाईलवर फोन करीत माहिती जाणली व संबंधिताने कॉपर तारांचे भंगार असलेले फोटो पाठवल्यानंतर स्थळ निश्चित करण्यात आल्यानंतर सोमवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता व्यापारी जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. रिक्षाने भादली गावातील चहाच्या टपरीवर थांबले. तेथूनच व्यापार्‍याने मोबाईल धारकाला फोन लावला असता चहा व्यावसायीकाने दुचाकीवर बसवून गावाच्या बाहेर असलेल्या पाटचारी जवळील पंप हाऊस येथे नेले. तेथे चहा टपरीवाल्यासह इतर अनोळखी 4 जणांनी व्यापार्‍याला पकडून मारहाण करून त्यांच्याजवळची सोन्याची साखळी, मोबाईल जबरदस्ती हिसकावला. व्यापार्‍याच्या फोन पे वरून 50 हजार आणि 40 हजार असे 90 हजार रुपये ऑनलाईन बळजबरीने ट्रान्सफर करून घेत आरोपी पसार झाले. मंगळवार. 10 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासाअंती पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील पाच आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे, सहा.निरीक्षक अमित बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, रवींद्र तायडे, हेड कॉन्स्टेबल शरद भालेराव, प्रशांत विरणारे, योगेश वराडे, शिवदास चौधरी, सागर बिडे यांनी यावल तालुक्यातील मनवेल येथील जंगलात जाऊन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल 1 लाख 51 हजार रुपयांचा जप्त करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !