जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना : नाराज छगन भूजबळांच्या वक्तव्याने मोठ्या भूकंपाची शक्यता
नागपूर (16 डिसेंबर 2024) : राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच पत्रकारांनी नाराजीवर बोट ठेवत पुन्हा भुजबळांना छेडल्यानंतर त्यांनी हो नाराज आहे, असे सांगितले. जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केल्यानंतर राज्यात आता काही राजकीय भूकंप तर नाही ना होणार ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
लवकरच भूमिका जाहीर करणार
भुजबळ म्हणाले की, आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार आहोत. ‘मला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं, त्यामुळे मी दु:खी आहे’, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक विधान करत आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. अनेकवेळा अशी मंत्रिपदे आली आणि गेली. मी विरोधी पक्ष नेता म्हणून देखील काम केलेलं आहे. शिवसेनेचा एकटा आमदार असतानाही मी सर्वांना तोंड देण्याचं काम केलं.
डावलले काय की फेकले काय कुणाला फरक पडतो
छगन भुजबळ जर नाराज आहेत तर तुमचे अजित पवार किंवा सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणे झाले आहे का? असा प्रश्न देखील भुजबळ यांना विचारण्यात आला होता मात्र मला त्याची काही आवश्यकता वाटली नसल्याचे भुजबळ म्हणाले. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय किंवा फेकले काय? कोणाला काय फरक पडतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयुष्यात अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत किंवा किती वेळा ती गेली देखील आहेत. परंतु छगन भुजबळ अद्याप संपला नाही. तुम्ही मंत्रीपदावर मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावलले, त्यांना विचारायला हवे, असे देखील भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.