पाचशे रुपयांची लाच भोवली : पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

ACB catches junior assistant of Panchayat Samiti in bribery case नाशिक (11 जानेवारी 2025) : वैद्यकीय बिलावर जावक क्रमांकाची नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना सटाणा (बागलाण) पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक रवींद्र दगा म्हसदे (48, न्यू प्लॉट, कचेरी रोड, सटाणा (बागलाण) नाशिक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शुक्रवार, 10 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
37 वर्षीय तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी त्यांनी खर्च केलेल्या रक्कमचे बिल तक्रार यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणे कामे पंचायत समिती, बागलाण येथे दाखल केले होते. सदरील बिलावर गटशिक्षण अधिकारी यांनी स्वाक्षरी केली होती. तरीदेखील यातील आरोपी लोकसेवक यांनी सदरील बिल जावक क्रमांक देऊन जिल्हा परिषद, नाशिक कार्यालय येथे पाठवले नव्हते. वैद्यकीय बिलावर जावक क्रमांक नोंद करून पुढे पाठविण्यासाठी तक्रारदार आरोपी लोकसेवक यांना भेटले असता त्यांनी फाईलवर जावक क्रमांक नोंद करून सदरील फाईल तक्रारदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीकामी देण्यासाठी 10 रोजी पाचशे रुपयांची लाच मागितल्यानंतर तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस हवालदार योगेश साळवे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
