पिंपळनेरातून सोयाबीन तेलाने भरलेली पिकअप पळवणार्या धुळ्यातील आरोपीला बेड्या
धुळे तालुका पोलीसांची कामगिरी : अवघ्या तीन तासांत चोरीचे वाहन जप्त

धुळे (23 फेब्रुवारी 2025) : पिंपळनेर शहरात सोयाबीन तेलाची वाहतूक करणारे महेंद्रा पिकअप वाहन शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरीला गेले. याबाबतची माहिती वायरलेसवरून जिल्हाभरात कळवण्यात आली. चोरीच्या वाहनासह संशयीत धुळ्याकडे पसार झाल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. आरीफ नूर मोहम्मद शेख (31, रा.मौलवीगंज, नॅशनल स्कूलजवळ, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले नेमके
हिरालाल रघुनाथ दशपुते (52, रा.पिंपळनेर, ता.साक्री) यांच्या मालकीची महिंद्रा पिकअप (एम.एच.18 ए.ए.5251) शनिवार, 22 रोजी पहाटे साडेपाच वाजता पिंपळनेरातून चोरीला गेले. या वाहनात सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या होत्या. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला. धुळे तालुका पोलीस अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपीने वाहनाचा बिलाडी-जापी रोडवर अपघात केल्याचे सांगून वाहन तसेच सोडल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी पाच लाखांचे वाहन दोन लाख आठ हजार 800 रुपये किंमतीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या मिळून सात लाख आठ हजार 800 रुपयांचा माल जप्त करत तो पिंपळनेर पोलिसांना सोपवला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस हवालदार हर्षल धनगर, पोलीस नाईक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, धीरज सांगळे, राहुल देवरे, प्रतीक देसले यांनी केली.
