मुक्ताईनगरातील शिक्षकाच्या वाहनाला एरंडोलजवळ अपघात : पत्नीचा जागी मृत्यू ; मुले गंभीर जखमी

एरंडोल (24 फेब्रुवारी 2025) : भरधाव कार कंटेनरवर धडकल्यानंतर झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती व तीन मुले गंभीर जखमी झाली. हा अपघात एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडला. मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काय घडले नेमके
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (46) हे आपल्या पत्नी रुपाली पाटील (40) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवार, 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.30 वाजता मुक्ताईनगरकडे परतताना एरंडोल ते जळगाव दरम्यान नॅशनल हायवेवर युपी ढाब्यासमोर अचानक कंटेनर क्रमांक (डब्ल्यूबी 23 एफ 472) हा रस्त्यावर अचानक आल्याने पाटील यांची कार त्याला मागून धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात राजेश पाटील, त्यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुले-खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.
पत्नीचा जागीच मृत्यू, मुले रुग्णालयात दाखल
अपघातानंतर रस्त्यावरून जाणार्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?
फिर्यादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनर चालकच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
