मृत्यूनंतरही सुंदर जग पाहण्यासाठी नेत्रदान करा : प्रा.दयाधन राणे
भुसावळातील भोळे महाविद्यालयात नेत्रदान जनजागृती

भुसावळ (25 फेब्रुवारी 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यक्रम झाला. प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख वक्ते म्हणून भौतीकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दयाघन राणे होते. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केला. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य संपर्क विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या निर्देशानुसार स्वातंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी ही मरणोत्तर नेत्रदान जनजागृती दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्देशावरून या कार्यक्रमाचे आयोजन होते. प्रा.डॉ.दयाघन राणे म्हणाले की, मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे इतर दोन अंध बांधवांना दृष्टी मिळते आणि आपण मृत्यूनंतर ही दुसर्याच्या माध्यमातून सृष्टी पाहू शकतो. मृत्यू झाल्यावर ही काही तास डोळे आणि इतर काही अवयव सक्रिय असतात. तेवढ्या वेळात ते काढून त्यांचे प्रत्यारोपण केल्यास इतर गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो. जे डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात ते मृतदेहाला विद्रूप होऊ देत नाही.
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनीही नेत्रदांचे महत्व स्पष्ट करून मृत्यूनंतरही इतरांच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश टाकण्यासाठी सर्वांनीच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके यांनी तर आभार महिला अधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय देविदास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित असल्याचे प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.
