सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या : मग आरोप असलेले मंत्री पदावर का ठेवता ?


Supriya Sule छत्रपती संभाजीनगर (26 फेब्रुवारी 2025) : आरोप झालेले किंवा कोणावर केस असलेले ओएसडी, पीएला घेणार नसल्याचे म्हणत आहात, तर मग आरोप असलेले आणि केस दाखल असलेले मंत्री तरी मंत्रिमंडळात का ठेवता? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे. त्या छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होत्या.

मग त्या मंत्र्यांसाठी वेगळा न्याय का
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला मात्र एक निर्णय ओएसडींना आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय? ओएसडी आणि पीए ठेवताना ज्याच्यावर आरोप झालेले कोणावर केस असेल, त्याला मी मंत्रालयात ठेवणार नाही असे म्हणत आहात, तर मग मंत्र्यांसाठी दुसरा कायदा का? असा सवालही सुळे यांनी केला.

वॉशिंग मशीन सिलेक्टिव्ह चालणार नाही
तुमचे सरकार खरेच भ्रष्टाचारमुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्ह चालणार नाही. सुरेश धस यांचे स्टेटमेंट मी ऐकले होते. आता ते मला खरे वाटत आहे. मी एकटी आरोप करत नाही सगळे करत आहेत. महाराष्ट्रमध्ये अनेक मंत्र्यावर असे आरोप होत आहेत हे दुर्दैव आहे. ज्यांना दोन वर्षे शिक्षा झाली आहे, ती कोर्टाने केली आहे आम्ही नाही केली. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. सातवा माणूस गायब आहे तरी कुठे? असा सवाल करत या जगामध्ये एवढे तंत्रज्ञान असताना कृष्णा आंधळे नावाचा खुनी फरार आहे. तो सरकारला सापडत नाही, यावर माझा विश्वास बसत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरोपी सापडत नाही असे कसे झाले याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !