थाळनेर पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्याची उकल : तीन आरोपींना अटक
मोबाईल क्रमांक लिहिलेली अर्धवट चिठ्ठी तपासातील दुवा : धुळे गुन्हे शाखेसह थाळनेर पोलिसांची स्तुत्य कामगिरी

Murder case solved in Thalner police station area: Three accused arrested धुळे (14 मे 2025) : थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत अनोळखीचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. तपासासाठी आव्हान असलेल्या या गुन्ह्याची उकल धुळे गुन्हे शाखेसह थाळनेर पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. मृताच्या खिशात आढळलेल्या अस्पष्ट चिठ्ठीतील आठ क्रमांक पोलिसांच्या तपासातील दुवा ठरले व त्यानंतर तीन मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
खून करून मृतदेह फेकला
शिरपूर-गरताड रोडलगत थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीत सोमवार, 5 मे 2025 रोजी एका शेतात अनोळखीचा खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला. मृताच्या कपड्यांमध्ये शर्टाच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली. तिच्यातील एका मोबाईल क्रमांकाचे 8 आकडे वाचता आल्याने पोलिसांनी संभाव्य शेवटच्या दोन आकड्यांचा सिरीयल क्रमांकाद्वारे शोध घेवून क्रमांक निष्पन्न होताच पोलिस मृताच्या मध्य प्रदेशातील नातेवाईकांपर्यंत पोहोचले व त्यानंतर आरोपींचाही सुगावा लागला.

मृत मध्यप्रदेशातील रहिवासी
या घटनेतील मृत उमेश ऊर्फ राहुल कंदारसिंह चौहान (रा.उपला, ता.राजपूर, जि.बडवाणी, ह.मु.नरडाणा) असल्याचे तपासात स्पष्ट झाले तर संशयीत आकाश पावरा, दिलीप पावरा, घनदास ऊर्फ गुड्डु पावरा तसेच अन्य अल्पवयीनाच्या मदतीने हा खून झाल्याचे उघड झाले आहे. मृत उमेश याने अल्पवयीनाला मारहाण केल्याच्या किरकोळ वादातून खुनाची ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेर प्रभारी शत्रुघ्न पाटील, समाधान भाटेवाल, दिलीप पवार, हवालदार संजय धनगर, पोहेकॉ शामसिंग वळवी, कॉन्स्टेबल उमाकांत वाघ, कॉन्स्टेबल किरण सोनवणे, कॉन्स्टेबल धनराज मालचे, कॉन्स्टेबल मुकेश पवार, चालक कॉन्स्टेबल दिलीप मोरे, कॉन्स्टेबल आकाश साळुंखे, कॉन्स्टेबल अनिकेत साळुंखे, थाळनेरचे अमित माळी, संजय पाटील, हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, हवालदार कैलास महाजन, कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, कॉन्स्टेबल गुलाब पाटील, जगदीश सुर्यवंशी, राजेश गीते, अमोल जाधव, राहुल गिरी आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
