धुळ्यात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन लाखांचे स्पिरीट जप्त

गुन्हे शाखेची धडक कारवाई : हिस्ट्री शिटरांची तपासणी, हॉटेल्ससह ढाब्यांची तपासणी


Spirit worth Rs 3 lakh seized in a combing operation in Dhule भुसावळ (15 मे 2025) : आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासह उपद्रवींचा बंदोबस्त करण्यासाठी धुळे शहराचे डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात 13 रोजी सायंकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत जिल्हाभरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. कारवाईदरम्यान धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अवैधरित्या दारू बनवण्यासाठी लागणार्‍या स्पिरीटची एका वाहनातून वाहतूक होत असल्याचे कळताच त्यांनी नाकाबंदी दरम्यान वाहन जप्त करीत सुमारे तीन लाखांचे स्पिरीट जप्त केले.

तीन लाखांचे स्पिरीट जप्त
सुरत बायपाससमोरील हिरे मेडिकल कॉलेजसमोर ट्रक क्रमांक (एम.एच.18 पी.जी.2999) मधून तीन लाख रुपये किंमतीचे दोन हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले. ट्रक चालक सुरेंद्र पंडित मराठे (42, नवीन बसस्थानक, सेंधवा, जि.बडवाणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेल्ससह ढाब्यांची तपासणी
24 ठिकाणी नाकाबंदी करून 96 मोटार वाहन कायद्याच्या केसेसद्वारा 47 हजार 700 रुपयांचा दंड वसुल झाला तर शहर व परिसरातील 70 हॉटेल्ससह ढाब्यांची तपासणी करण्यात आली. अवैध हातभट्टीच्या 13 केसेस तर मोकळ्या जागेत दारू पिणार्‍या तिघांवर तसेच सोडा विक्रीच्या गाड्यांवर दारू पिणार्‍या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील आठ हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले तर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणार्‍या तिघांवर शहर हद्दीत तर दोघांवर शिरपूर हद्दीत करवाई करण्यात आली.

24 अधिकार्‍यांचा सहभाग
धुळे शहर व जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या नाकाबंदी व कोम्बिंगमध्ये स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, 24 अधिकारी तसेच 80 अंमलदार सहभागी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !