आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी : धुळ्यात माजी आमदार अनिल अण्णांनी खोलीला कुलूपच ठोकले

Five and a half crores to be given to MLAs: Former MLA Anil Anna locks the room in Dhule धुळे (21 मे 2025) : विधिमंडळ अंदाज समितीचे 11 आमदार धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी शासकीय विश्रामगृहावर धडक दिली. गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 त्यांनी ठिय्या मांडला आहे. या खोलीमध्ये आमदारांना देण्यासाठी आणलेले साडेपाच कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून प्रशासनातील जिल्हाधिकारी वा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत या खोलीचे कुलूप उघडण्याची मागणी माजी आमदारांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही ट्विट करत खळबळ उडवून दिली. यासाठीच का आमचे सरकार पाडले? असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पथक घटनास्थळी दाखल
घटनास्थळी प्रांताधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकार्यांनी धाव घेतली असून अद्याप कारवाईचा तपशील बाहेर आलेला नाही.

102 क्रमांकाच्या खोलीत घबाड : माजी आमदारांचा आरोप
धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या अंदाज समितीतील 11 आमदारांना देण्यासाठी पाच ते साडेपाच कोटी रुपयांची रक्कम गोळा करण्यात आली व ती 102 क्रमांकाच्या खोलीत ठेवण्यात आल्याचा दावा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. कुलूपबंद खोलीबाहेर अनिल गोटे आणि पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत.
महाराष्ट्र लुटण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले का? संजय राऊत
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट करत सरकारी यंत्रणांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, आत्ताची ताजी खबर. विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौर्यावर आली असता, या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकार्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासाठीच पाडले ठाकरे सरकार ?
विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकार्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच!, असा संतप्त सवाल संजय राऊतांनी महायुतीला केला आहे.
