धुळ्यातील माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा दावा ठरला खरा : शासकीय विश्रामगृहातील ‘त्या’ खोलीत सापडली पावणे दोन कोटींची रक्कम

धुळे (22 मे 2025) : विधिमंडळ अंदाज समितीचे 11 आमदार धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी शासकीय विश्रामगृहावर धडक देत गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 बाहेर ठिय्या मांडला होता. या खोलीमध्ये आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. या गंभीर आरोपाची स्थानिक प्रशासनाने दखल घेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दालनाचे कुलूप उघडल्यानंतर दालनात तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रक्कम आढळल्याने धुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
पथकाला फुटला घाम : तब्बल चार तासाहून अधिक चालली मोजणी
प्रांताधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकार्यांनी धाव घेतली. विशेष म्हणजे खोलीत आढळलेली रक्कम मोजण्यासाठी दोन ते तीन मशीन मागवण्यात आले व रात्री 11 वाजेपासून चाललेली कारवाई साधारण पावणेतीन वाजेपर्यंत चालली. इतकी मोठी रक्कम मोजताना अधिकाऱ्यांनाही घाम सुटला.

102 क्रमांकाच्या खोलीत घबाड : माजी आमदारांचा आरोप
धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या अंदाज समितीतील 11 आमदारांना देण्यासाठी पाच ते साडेपाच कोटी रुपयांची रक्कम गोळा करण्यात आली व ती 102 क्रमांकाच्या खोलीत ठेवण्यात आल्याचा दावा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. याबाबतचे गौड बंगाल समोर येण्यासाठी कुलूपबंद खोलीबाहेर अनिल गोटे आणि पदाधिकारी ठाण मांडून बसले होते.
