धुळ्यात शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणाची एसटीआयटी चौकशी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती


STIT probe into cash found in government rest house in Dhule : Chief Minister’s announcement मुंबई (22 मे 2025) : धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाखांची रोकड आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने बुक केलेल्या खोलीत सापडली होती. माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणावरून सरकार व जिल्ह्यात आलेल्या समितीवर टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे.

धुळ्यातील रोकड प्रकरणाची होणार एसटीआयटी चौकशी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या कॅश प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. विधिमंडळाची एखादी समिती कुठे जात असेल व तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. या प्रकरणी दूध का दूध व पाणी का पाणी झाले पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासह पाकसाठी हेरगिरी करणार्‍या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणावरही भाष्य केले.

होवू द्या दुध का दुध….
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधीमंडळाची कोणतीही समिती कुठे जात असेल आणि त्यांच्यावर प्रश्न निर्माण होत असतील तर आमचे कर्तव्य आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. म्हणून आम्ही धुळे शासकीय विश्रामगृह प्रकरणी एसआयटी स्थापन करत तपास करणार आहोत. याबद्दल विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींना एक समिती बनवून या सर्व गोष्टीचा तपास करावा. अशी मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होईल तिथे कारवाई केली जाईल.

माजी आमदारांच्या आरोपानंतर यंत्रणा हलली
धुळे-नंदुरबार दौर्‍यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीला खुश करण्यासाठी ‘वर्गणी’ जमा करून ती रक्कम समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या नावे बुक असलेल्या विश्रामगृहातील खोलीत ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी करीत ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रशासन हलले व मध्यरात्री रोकडची मोजणी करण्यात आल्यनंतर तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड सापडली.

वैष्णवीची हत्या की आत्महत्या : सखोल चौकशी
देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, वैष्णवी हगवणेचे बाळ तिच्या आई-वडिलांकडे पोहचले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडे असणारी ऑडिओ क्लिप तथा तिच्या अंगावरील वळ पाहता या प्रकरणी दोन्ही अंगाने तपास केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, ज्योती मल्होत्राच्या केसमध्ये व्हाईट कॉलर असल्याचे भासवत लोक कसे देशद्रोह करतात हे दिसून येत आहे. तिने कुठे-कुठे रेकी केली हे आता समोर येत आहे. अशी रेकी अजून कुणी केली का हे शोधले जात आहे. देशाच्या विरोधात जो पण व्यक्ती जाईल आम्ही त्यांना सोडणार नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !