कोरोना : दोघांच्या मृत्यूनंतर साक्रीसह धुळे शहर सील
धुळे : मालेगावच्या 22 वर्षीय तरुणीसह साक्रीतील 53 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह प्रौढाचा मृत्यू झाल्यानंतर साक्रीसह धुळे शहर सील करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचा निवास परीसर सील करण्यात आला आहे. साक्री येथील प्रौढावर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता तर तपासणीच्या अहवालात या वृद्धाला कोरोना झाल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती तर त्यानंतर मालेगाव येथून उपचारार्थ दाखल झालेल्या 22 वर्षीय तरुणीचाही शनिवारी पहाटे मृत्यू ओढवल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन्ही शहरे सील
कोरोना पॉझीटीव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर साक्रीसह धुळे शहर पोलिसांनी पूर्णपणे सील केले आहे. शासकीय यंत्रणेने शुक्रवारी रात्री 12 वाजेपासून तर रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आरोग्य सेवा वगळता संचारबंदी जारी केली आहे. नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

24 नागरीकांना धुळ्यात हलवले
साक्री येथील वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील 14 जणांसह अन्य दहा जणांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले असून त्यांची तपासणी केली जात आहे.
साक्रीत प्रशासन सतर्क
साक्रीतील वृद्धाचा मृत्यू ओढवल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरीकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे शिवाय मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरातील पोळा चौक केंद्रबिंदू ठरवून आजुबाजूचे 3 कि.मी.पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असल्याचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी सांगितले.

